पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली येथे शांतता समितीची बैठक संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : आगामी सण आणि उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदगीर शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झाली. याबाबत माहिती अशी की, दिनांक 14/06/2023 रोजी उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक शांतता समितीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये आगामी काळात बकरी ईद (ईद-उल-अजहा) व आषाढी एकादशी सारखे महत्त्वाचे सण साजरे होणार असून त्या अनुषंगाने सदरचे सण अतिशय उत्साही वातावरणात व निर्विघ्नपणे पार पाडण्या साठी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.आगामी सण उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता लातूर जिल्हा पोलीस दलाची तयारी पूर्ण झाली असून पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले. तसेच सदर बैठकीत मार्गदर्शन करीत असताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, मागील काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमांतून धार्मिक आणि जातीय भावना दुखावून दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे स्टेटस, व्हिडिओ क्लिप्स,आक्षेपार्ह मजकूर, एसएमएस तयार करून प्रसारित करण्याच्या घटना घडल्या असून या सर्व बाबींना आळा घालण्याकरिता लातूर पोलिसांनी ‘लातूर सोशल मीडिया वॉचर्स’ ही व्यवस्था अधिक प्रभावीपणे चालू केली आहे. नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळण्याचं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमांतून पसरवण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची जनतेने प्रसारणापूर्वी सर्वप्रथम खात्री करणे अत्यावश्यक आहे. पोलीस सर्व परिस्थितीला हाताळण्यास सक्षम असून, सायबर पोलीस टीम तंत्रज्ञान आणि लातूर सोशल मीडिया वाचर्स टीमच्या साहाय्याने सर्व सोशल मीडिया साइटवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या सोशल मिडिया पेट्रोलिंगमुळे सातत्याने थेट आणि धडक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या कारवाई नुसार मागील काही दिवसाच्या कालावधीत लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणांमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय न करता, त्यांच्याविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येत आहे. सामाजिक शांतता खराब करून अशांतता होईल, असं वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरोधात विविध कलम व कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या काही अल्पवयीन मुलांना सुद्धा पालकासह पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांनी केलेली पोस्ट डिलीट करण्यात आलेली असून त्यांना समज देण्यात आलेली आहे.