पत्नीपीडित पतीची आत्महत्या, गुन्हा दाखल.
उदगीर (प्रतिनिधी) महिलावर वाढलेल्या कौटुंबिक हिंसाचाराचा विचार करून कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा अमलात आणला गेला. मात्र काही ठिकाणी नेमके याच्या उलट होत असून, महिला कडून पतीचा छळ केला जात असल्याच्या घटना घडत आहेत. काहीसा असाच प्रकार उदगीर शहरालगत असलेल्या निडेबन येथे घडला आहे, पत्नी सतत भांडून त्रास देते. असे पत्र खिशात ठेवून एका पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रागाच्या भरात पत्नी माहेरी गेली. म्हणून पतीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, उदगीर शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निडेबन येथील सुभाष गोविंदराव सूर्यवंशी यांनी उदगीर ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली की, त्यांचा मुलगा मयत राजरतन सुभाष सूर्यवंशी यांच्यासोबत त्याची पत्नी भारती राजरतन सूर्यवंशी उर्फ भारती शृंगारे दररोज भांडणे, तक्रारी करत होती. दिनांक १३ रोजी मंगळवारी नेहमीप्रमाणे भारतीने भांडण करून ती माहेरी निघून गेली. राजरतन यास हा प्रकार सहन न झाल्याने त्याने आपल्या खिशात चिठ्ठी ठेवून, आपल्या भावाच्या निडेबन येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची बाब सदरील पत्रात आढळून आल्याने, आणि मयताच्या वडिलांची तक्रार असल्याने मयत राजरतन सूर्यवंशी याची पत्नी भारती हिच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. न. 374/ 23 कलम ३०६ भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करत आहेत.