मजुराकडून विद्युत पोलवरील पुरवठा सुरळीत करत असताना गंभीर अपघात, तिघा विरुद्ध गुन्हा दाखल

मजुराकडून विद्युत पोलवरील पुरवठा सुरळीत करत असताना गंभीर अपघात, तिघा विरुद्ध गुन्हा दाखल

उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर तालुक्यातील मौजे वाढवणा येथे शेतात काम करणाऱ्या मजुराला पोल वरून लाईट गेली आहे. पोलवर चढून विद्युत पुरवठा सुरळीत कर, असे सांगून विद्युत पुरवठा करण्याचीकोणतीही तांत्रिक माहिती नसलेला शेतमजूर पोलवर चढून विद्युतचे काम करत असताना, गंभीर स्वरूपाचा अपघात होऊन मजूर रुक्माजी गोविंद तेलंगे (वय 46 वर्ष धंदा मजुरी रा. बेळसांगवी ता. जळकोट जि. लातूर) हा पोलवरून खाली पडला. जोराचा शॉक लागल्यामुळे फिर्यादीचा डावा हात भाजून निकामी झाला आहे. तसेच मानेचे हाड मोडून इतरही ठिकाणी गंभीर मार लागल्याने जखमी होऊन वैद्यकीय उपचार घेत आहे. अशा आशयाच्या एम एल सी जबाबदावरून वाढवणा पोलीस स्टेशन येथे रुकमजी गोविंद तेलंगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी किशनराव भालेकर, सहाय्यक गजानन त्र्यंबक कोरे, ऑपरेटर सचिन अनिल काठेवाड (सर्व रा. वाढवणा बु. ता. उदगीर जि. लातूर) यांच्याविरुद्ध गु.र.न. 136 /23 कलम 308, 34 भारतीय दंड विधान संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे अधिक तपास करत आहेत.
ग्रामीण भागात सतत विद्युत पुरवठा खंडित होत असून तांत्रिक ज्ञानाचा अभाव असताना देखील मजूर किंवा शेतकऱ्यांची मुले विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा, म्हणून सरळ विद्युत पोलवर चढून विद्युत सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असल्याने अशा पद्धतीच्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक पाहता अधिकृत वायरमन, त्यांचे सहाय्यक आणि इतर तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारी यांनी ही कामे करायला हवीत. असे असताना देखील मजुराला असे काम करायला लावल्याबद्दल लोकांमध्ये विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्याबद्दल चीड निर्माण झाली आहे.

About The Author