आता अहमदपूरमध्येच होणार नीट व जेईई परीक्षेची संपूर्ण तयारी

आता अहमदपूरमध्येच होणार नीट व जेईई परीक्षेची संपूर्ण तयारी

अहमदपूर ( गोविंद काळे ) महात्मा गांधी महाविद्यालयाच्या स्वतंत्र सीईटी सेल मार्फत वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) व अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षा (जेईई व एमएचटी-सीईटी) ची संपूर्ण तयारी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी अहमदपूर व परीसरातील विद्यार्थ्यांना आता कुठेही बाहेर जाण्याची व धावपळ करण्याची गरज नाही. या संधीचा लाभ सर्व विद्यार्थी व पालकांनी घ्यावा असे आवाहन विचार विकास मंडळ अहमदपूर चे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. किशनराव बेंडकुळे व सचिव अॅड. पी.डी. कदम यांनी केले आहे.

इ.स. १९९० पासून तब्बल दोन दशकांपेक्षा जास्त काळ महात्मा गांधी महाविद्यालय हे नाव महाराष्ट्राच्या शिक्षण पटलावर अग्रेसर होते. या महाविद्यालयाने आजपर्यंत दहा हजार पेक्षा जास्त इंजिनिअर, दोन हजार पेक्षा जास्त डॉक्टर व पन्नास पेक्षा जास्त सनदी अधिकारी व वर्ग श्रेणी-१ चे अधिकारी समाजाला दिलेले आहेत. मागील आठ-दहा वर्षात हे नाव थोडे मागे पडले होते. या काळात येथील विद्यार्थ्यांना बाहेर ठेवत असतांना विद्यार्थी व पालकांची खूप गैरसोय झाली व त्रासही सहन करावा लागला. त्यामुळे नुतन कार्यकारीणीने पुढाकार घ्यावा अशी मागणी समाजाच्या सर्व स्तरातुन मोठया प्रमाणात येत होती. संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारीणीच्या पहिल्याच बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. हा उपक्रम राबविण्यासाठी संस्था संपूर्ण सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करुन देणार आहे. कोटा व अन्य ठिकाणचे तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक उपलब्ध करुन नीट व जेईई परीक्षेची संपूर्ण तयारी अत्यंत प्रभावीपणे करुन घेण्यात येणार आहे.

विचार विकास मंडळाचा हा संकल्प पुर्ण करण्यासाठी इयत्ता १० वी परीक्षेस ८०% व त्यापेक्षा जास्त गुण संपादन करणारे विद्यार्थी, पालक, विचार विकास मंडळ कार्यकारीणी पदाधिकारी व संचालक, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक तसेच संबंधित शिक्षक यांची इयत्ता ११वी प्रवेशपूर्व संयुक्त बैठक विचार विनिमय करुन निर्णय घेण्यासाठी महात्मा गांधी महाविद्यालयात दिनांक २५/०६/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. या बैठकीस अहमदपूर व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

विचार विकास मंडळ अहमदपूरचे नवनिर्वाचित अध्यक्ष/सचिव यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे

  1. महात्मा गांधी महाविद्यालयाच्या स्वतंत्र सीईटी सेल मार्फत वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा (नीट) व अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षा (जेईई व एमएचटी-सीईटी) ची संपुर्ण तयारी अत्यंत प्रभावीपणे करुन घेण्याचा निर्णय विचार विकास मंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आला आहे.
  2. हा उपक्रम राबविण्यासाठी लागणाऱ्या सुविधा, सामग्री व मनुष्यबळ मंडळ उपलब्ध करुन देणार आहे. यामध्ये कोटा व इतर ठिकाणाहून चार विषयासाठी तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक उपलब्ध करुन देणार आहेत.

३.अभ्यासक्रमाचे सुक्ष्म नियोजन, आठवडी व मासिक सराव परीक्षा नियमित घेणे व त्याचा निकाल वेळेवर लावणे, दररोज शंका निरसन तासिका (डिएसपी) ठेवणे

४.सीईटी सेल अद्ययावत करणे

५.डिजिटल क्लास रुमची निर्मिती करणे.

६.नीट / जेईई / एमएचटी-सीईटी पुस्तकांचे स्वतंत्र ग्रंथालय व रिडिंग रूम उपलब्ध करुन देणे आदींची माहीती देण्यात आली

या पत्रकार परिषदेस अँड. किशनराव बेंडकुळे अध्यक्ष,अँड. पी. डी. कदम सचिव,ॲड. वसंतराव फड सहचिटणीस, सुरेशराव देशमुख सहचिटणीस, रामचंद्रराव शेळके कोषाध्यक्ष,
बी. एस. जाधव सदस्य, श्रीमती कॅप्टन डॉ. अनिता शिंदे प्राचार्य,प्रा. हेमंत पाटील प्राध्यापक प्रतिनिधि सदस्य,प्रा. पी. बी. बाभुळगावकर उपप्राचार्य,प्रा. जे. पी. कुलकर्णी पर्यवेक्षक,प्रा.डॉ. विनोद माने, संजय सुर्यवंशी कार्यालयीन अधिक्षक आदींची उपस्थिती होती

About The Author