श्रद्धा जगताप यांनी मोफत शिवणकला केंद्राच्या मार्फत महिला स्वावलंबनाची दारे उघडली – माजी आ. भालेराव

श्रद्धा जगताप यांनी मोफत शिवणकला केंद्राच्या मार्फत महिला स्वावलंबनाची दारे उघडली - माजी आ. भालेराव
श्रद्धा जगताप यांनी मोफत शिवणकला केंद्राच्या मार्फत महिला स्वावलंबनाची दारे उघडली - माजी आ. भालेराव

उदगीर (एल. पी. उगीले) महिलांच्या सर्वांगीण प्रगती सोबतच त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने सामाजिक जाणीव जपणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस श्रद्धा जगताप यांनी उदगीर शहरात महिलांच्या स्वावलंबनासाठी मोफत शिवणकला प्रशिक्षण केंद्र सुरू करून एक आदर्श निर्माण केला आहे. संकल्प सेवाभावी केंद्राच्या वतीने केलेला संकल्प त्यांनी पूर्णत्वास नेला आहे. दिलेला शब्द पाळला आहे. उदगीर शहर आणि परिसरातील महिलांच्या प्रगतीसाठी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवउद्गार माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सुधाकरराव भालेराव यांनी काढले. ते उदगीर येथील लासूने कॉम्प्लेक्स मध्ये संकल्प सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला व मुलींसाठी मोफत शिवणकला प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
या प्रसंगी उदगीर नगरपालिकेच्या माजी सभापती अरुणा चीमेगावे, सोमनाथपूर ग्रामपंचायतच्या सदस्य शिवकर्णा अंधारे, लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे कार्यवाह शंकरराव लासुणे, सुरेंद्र अक्कनगिरे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांनी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलताना माजी आमदार सुधाकर भालेराव म्हणाले की, महिला सक्षमीकरण हा भारतीय जनता पक्षाचा उद्देश असून महिला सक्षम आणि स्वावलंबी झाल्या तर समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होणार आहे. तशी प्रगती व्हावी, या उदात्त हेतूने श्रद्धा जगताप यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघातील महिला आणि मुलींसाठी एक नवे दालन सुरू केले आहे. त्याचा आदर्श इतरही महिलांनी, कार्यकर्त्यांनी घेणे गरजेचे आहे. ज्या महिला या प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रशिक्षण घेऊन स्वतः स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असतील त्यांना बँकेमार्फत विविध योजना अंतर्गत माफक दरामध्ये शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. असे आश्वासनही याप्रसंगी सुधाकरराव भालेराव यांनी दिले.
श्रद्धा जगताप यांनी संकल्प सेवाभावी संस्थेच्या माध्यमाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे उदगीर शहरातील गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील महिला व मुलींमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्घाटनाच्या दिवशीच अनेक महिला आणि मुलींनी नाव नोंदणी करून विक्रम केला आहे.
प्रास्ताविक भाषण संकल्प सेवाभावी संस्थेच्या श्रद्धा जगताप यांनी केले, संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील महिलांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा आपला संकल्प असून त्याचा एक टप्पा म्हणून या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ राजकारणच नाही तर समाजकारण करत सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणे, हा आपला स्वभाव असल्यामुळे आपण असे उपक्रम हाती घेत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

About The Author