जल जीवन मिशन योजनेतून दर्जेदार कामे होणे आवश्यक – खा.सुधाकर शृंगारे
कामे सुरु असताना अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी करावी
कामाचा दर्जा नित्कृष्ट असल्यास देयके अदा करू नयेत
लातूर (प्रतिनिधी) : जल जीवन योजनेच्या माध्यमातून मार्च 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरविण्याचा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या योजनेतून होणारे प्रत्येक काम दर्जेदार होईल, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. कामे सुरु असताना अचानक जावून कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी, अशा सूचना जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष तथा खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दिशा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, अशासकीय सदस्य चंद्रकात स्वामी, अनिल चव्हाण, अंगद भोसले यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जल जीवन मिशन योजनेतून जिल्ह्यात सुरु असलेल्या काही कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या कामांची तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून होणारे प्रत्येक काम दर्जेदार होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे खासदार श्री. शृंगारे यावेळी म्हणाले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून जिल्ह्यात मंजूर घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जल जीवन मिशन योजना केंद्र सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना असून या योजनेतील कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच कार्यारंभ आदेश देवूनही कामे सुरु करण्यास विलंब करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून ही कामे वेळेत सुरु होतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील महामार्गांची कामे, महामार्गांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. जिल्ह्यात भूजल पुनर्भरण, विहीर पुनर्भरणासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विशेष मोहीम राबवून शोषखड्डे खोदण्यात यावेत. तसेच शहरी भागातील प्रत्येक इमारतीला ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक करावे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
केंद्र शासनामार्फत निधी देण्यात येणाऱ्या सुमारे 29 विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले. यशवंत पंचायतराज अभियानात लातूर जिल्हा परिषदेने राज्यात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूर पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गट विकास अधिकारी तुकाराम भालके, जळकोट पंचायत समितीने विभागात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.