नाना नानी पार्क येथे वाचन कट्ट्याचे उद्घाटन

नाना नानी पार्क येथे वाचन कट्ट्याचे उद्घाटन

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मनपाचा उपक्रम

लातूर (प्रतिनिधी) : वाचन संस्कृती वाढीस लागावी या हेतूने लातूर शहर महानगरपालिकेच्या श्री शिवछत्रपती ग्रंथालयाच्या वतीने शहरातील नाना नानी पार्क येथे वाचन कट्टा सुरू करण्यात आला.राष्ट्रीय वाचन दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि.१९ )मनपाच्या सहाय्यक आयुक्त सौ.मंजुषा गुरमे यांच्या हस्ते या वाचन कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास श्री शिवछत्रपती ग्रंथालयाचे ग्रंथपाल अमित म्हेत्रे,झोन डी चे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे,ग्रंथालय कर्मचारी नागसेन धावारे, दिलीप गायकवाड,अनिता गायकवाड,राजेंद्र कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.शहरातील ज्येष्ठ नागरिक,महिला व मुला- मुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,वाचन संस्कृती टिकावी या दृष्टिकोनातून आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची कल्पना मांडली.शहरातील चार झोनमध्ये आठ ठिकाणी असे वाचन कट्टे तयार केले जाणार आहेत.त्यापैकी पहिल्या वाचन कट्ट्याचे उद्घाटन सोमवारी संपन्न झाले.

या वाचन कट्ट्यामध्ये स्थानिक व प्रादेशिक वृत्तपत्र वाचण्यासाठी मोफत उपलब्ध असणार आहेत.नागरिकांनी तेथे बसून दैनिकांचे वाचन करावे.आपले वाचन झाल्यानंतर दैनिक व्यवस्थित पूर्वीसारखेच जागेवर ठेवावे.इतरांनाही ते वाचण्यासाठी मिळेल याची काळजी घ्यावी,असे आवाहन सौ.मंजुषा गुरमे यांनी केले.शहरातील नागरिकांनी या वाचन कट्ट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author