लिंगायत समाजाला आरक्षण नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान – प्रा.सुदर्शनराव बिरादार

लिंगायत समाजाला आरक्षण नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान - प्रा.सुदर्शनराव बिरादार

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील लाखो लिंगायतांना ओबीसीचे आरक्षण मिळत नसल्यामुळे लिंगायत समाजातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे असे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी म्हटले आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या जीवनात निकालाचा व प्रवेशाचा काळ असून दहावी व बारावीच्या परिक्षेत असंख्य विद्यार्थ्यांनी खुप चांगले यश संपादन केले आहे. पण चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यात त्यांना यश येताना दिसून येत नाही. आपल्याच वर्गातील इतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहेत व आपणास चांगले गुण मिळवूनही प्रवेश मिळत नाही याची खंत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.

95 ते 97 टक्के मार्क्स मिळवूनही पदरी निराशाच येत असल्याच्या असंख्य पालकांच्या तक्रारी आहेत. स्पर्धा खुप मोठी झाली असुन या स्पर्धेत लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना टिकायचे असेल तर अजुन गुणवत्ता वाढविली पाहिजे. व तसेच त्याच्या जोडीने ओबीसी आरक्षणाचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे तरच ही मुले पुढील स्पर्धेत टिकतील. केवळ प्रवेशातच नाही तर नौकरी मिळवितांना, मेडीकलला लागताना, एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धे परिक्षेसाठी सुध्दा आरक्षणाची गरज या विद्यार्थ्यांना भासत आहे. हिंदु वाणी नावाला आरक्षण लागू झाले आहे. ती चांगली बाब आहे. मात्र लाखोंच्या संख्येने लिंगायत नावाने जातीची नोंद असणार्‍या विद्यार्थ्यांना या ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नाही. लिंगायत व वाणी हे एकाच जातीची दोन नावे आहेत. लिंगायत व वाणी यांना एकच धरून वाणी नावाला लागू असलेले आरक्षण सरसकट लिंगायत नावाला लागू करावे यासाठी शासनाने शुध्दीपत्रक काढावे अशी मागणी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

About The Author