भगवानदादा पाटील तळेगावकर यांच्या विकास कार्यावर शिक्कामोर्तब!!
भाऊसाहेब सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध
उदगीर (एल.पी.उगीले) – सहकार महर्षी स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांचा वसा आणि वारसा जपत भगवानराव पाटील तळेगावकर यांनी भाऊ साहेबांनी स्थापन केलेल्या यशवंत अर्बन बँकेला विकसित करून त्यांचे नामकरण भाऊसाहेब सहकारी बँक असे केले. आज या बँकेच्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी शाखा स्थापन करण्यात आल्या असून बँकेने विश्वासार्हता कमावली आहे. भाऊसाहेबांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचे कार्य बँकेचे चेअरमन तथा उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, शिक्षण महर्षी भगवानदादा पाटील तळेगावकर यांनी केले आहे त्यांच्या या विकास कामाची भाऊसाहेब सहकारी बँकेच्या सर्व सभासदांनी दखल घेऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची संचालक म्हणून बिनविरोध निवड केली आहे.
भाऊसाहेब सहकारी बँक लि. उदगीर या बँकेची २०२३-२४ ते २०२८-२९ या पाच वर्षांसाठीच्या तेरा संचालक मंडळासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दि.१६ जून या शेवटच्या दिवस होता.
सर्वसाधारण प्रतिनिधी मतदार संघातून भगवान रामचंद्रराव पाटील तळेगावकर, किशन बापूराव हरमुंजे, मनोज रामदास पुदाले, तानाजी भगवानराव पाटील, वैभव देवीदासराव औटे, रविंद्र शिवकुमार हसरगुंडे, विजयकुमार भीमाशंकर पारसेवार, दिनेश पंढरीनाथ पाटील, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून वसंतराव नारायणराव सोनकांबळे, महिला प्रतिनिधी मतदारसंघातून उत्तरा मल्लिकार्जुन कलबुर्गे व कोमल नागोराव बिरादार, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातून गोपीनाथ नामदेवराव सगर, विमुक्त जाती/भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून ईश्वर शेषेराव खटके या तेरा जणांचे नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले होते.
प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी सोमवारी करण्यात आली. त्यात सर्व तेरा उमेदवारांचे अर्ज मंजूर झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. एस. नांदापुरकर यांनी जाहीर केले. तेरा संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी तेराच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.