लेखी आश्वासनानंतर मरशिवणी ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन मागे

लेखी आश्वासनानंतर मरशिवणी ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन मागे

अहमदपूर ( गोविंद काळे ) शहरापासून अगदी दोन कि.मी. अंतरावर असलेल्या मरशिवणी या गावासाठी स्वतंत्र सर्व्हिस रोड मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी दि. १९ जून रोजी मरशिवणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अधिकारी आंदोलनस्थळी येऊन सर्व्हिस रोड मंजुरीची प्रक्रिया चालू आहे. लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, असे लेखी आश्वासन दिल्यामुळे रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

सदर रस्ता रोको आंदोलन हे तात्पुरते मागे घेण्यात आले असून, लवकरच कामाची सुरुवात नाही झाल्यास पुढील काळात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दिला आहे. माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपा लोकसभा मतदार संघाचे प्रमुख दिलीपराव देशमुख यांनी सदर रस्ता रोको आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी अॅड. निखिल कासनाळे, संजय गुणाले, अंगद दोडे, रामकिशन आमुगे, अन्वर पटेल, प्रभू जाधव, उमाकांत पाटील, श्रीराम आमुगे, दत्तात्रय दोडे, मुक्तिराम पाटील, बाबुराव पांचाळ, बालाजी गुणाले, सुरेश हानमंते, अतुल हनमंते, उत्तम राठोड यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ, युवक व महिला यांची उपस्थिती होती.

About The Author