कृषि विभागाची 16 कृषि सेवा केंद्रांवर कारवाई
14 परवाने निलंबित, 2 परवाने कायमस्वरूपी रद्द
लातूर (प्रतिनिधी) : खरीप हंगामात शेतकऱ्यांन वेळेत बियाणे व खते पुरवठा होण्यासाठी कृषि विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 16 कृषि निविष्ठा विक्री केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 14 कृषि निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 2 कृषि निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
कृषि आयुक्तांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषि निरीक्षकाकडून कृषि निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान कृषि निविष्ठा केंद्रात विक्री परवाना दर्शनी भागात न लावणे, साठा व भावफलक सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित न करणे, साठा नोंदवही अद्यावत न ठेवणे, बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा न घेणे, विक्री बिलात बियाण्यांचा संपूर्ण तपशील न लिहिणे, दुकानात वजन काटा न ठेवणे, विक्रीस ठेवलेल्या बियाण्यांचे व खताचे स्त्रोत न ठेवणे, विहित मुदतीत परवान्याचे नुतनीकरण करून न घेणे, लिंकिंग करणे आदी त्रुटी आढळून आल्या.
या कृषि निविष्ठा विक्री केंद्रांवर करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्ह्यातील दहा बियाणे विक्री केंद्र आणि चार खत विक्री केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच एका बियाणे विक्री केंद्राचा आणि एका खत विक्री केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेल्या कृषि निविष्ठा विक्री केंद्रांमध्ये औसा तालुक्यातील पाच, लातूर तालुक्यातील तीन, अहमदपूर तालुक्यातील चार, चाकूर तालुक्यातील दोन, रेणापूर तालुक्यातील एक व निलंगा तालुक्यातील एक अशा एकूण 16 कृषि निविष्ठा विक्री केंद्रांचा समावेश आहे. कृषि निविष्ठा विक्री केंद्रांची नियमित तपासणी केली जात असून पेरणीच्या तोंडावर तपासणीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या तपासणीत अनियमितता आढळून आल्यास विक्री केंद्राचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात येत आहेत, अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे.
त्रुटी आढळून आल्यास कठोर कारवाई करणार – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
यापुढे साठा फलक व भावफलक प्रदर्शित न केल्यास, साठा नोंदवहीतील साठा व प्रत्यक्षात साठा यामध्ये तफावत आढळून आल्यास, तसेच बियाणे व खताचा भावफलक, साठा नोंदवही अद्यावत नसल्यास, बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा घेत नसल्यास, विक्री बिलात बियाण्यांचा संपूर्ण तपशील लिहित नसल्यास, दुकानात विक्रीस ठेवलेल्या उत्पादकाचा स्त्रोत समावेश करून न घेतल्यास, खताची अथवा बियाणाची लिंकिंग केल्यास विक्री केंद्राविरुद्ध खत नियंत्रण आदेश 1985, तसेच बियाणे नियंत्रण आदेश 1983, बियाणे नियम 1968 व अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी सांगितले. तसेच दुकानात होणारी गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लागणारी खते पाऊस पडण्यापूर्वीच खरेदी करावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.