पहिल्याच पावसाने बसस्थानकातील गैरसोयी चव्हाट्यावर, प्रवाशांची तारांबळ!
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर बस स्थानकाचे बांधकाम सुरू असून नागरिकांसाठी पर्याप्त पर्यायी व्यवस्था करण्यात आलेल्या नाहीत. यासंदर्भात अनेक वेळा प्रवाशाकडून ओरड होऊन देखील, परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने दखल घेतली नाही,लोकप्रतिनिधींनी या संदर्भात गांभीर्याने कोणते पाऊल उचलले नाहीत. बस स्थानकाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी प्रवाशांना बसण्यासाठी योग्य पद्धतीचा निवारा, महिला आणि मुलींसाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था. अशा महत्त्वाच्या गरजा पूर्ण करणे गरजेचे असताना देखील कंत्राटदारावर मेहरबानी करणाऱ्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी प्रवाशाच्या समस्या वाऱ्यावर सोडून, भूमिपूजन आणि बांधकाम सुरू करण्यासाठी मोठी स्मशान घाई करण्यात आली.
इतकेच नाहीतर हे काम कोणी सुरू केले? कोणी आणले? याचे श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची चढाओढ लागली होती. माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या कार्यकाळात 5 ऑगस्ट 2019 रोजी अधिकृतपणे भूमिपूजन संपन्न झाले होते. मात्र त्या नंतर सरकार बदलल्यामुळे निविदा स्थगित करण्यात आल्या होत्या. पुन्हा भाजप शिवसेनेचे सरकार आल्यानंतर ती निविदा पूर्ववत करून काम सुरू करण्यात आले होते. मात्र या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्यामुळे हे काम राष्ट्रवादी मुळेच झाले, असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भूमिपूजन केलेला भाजपचा दगड बाजूला काढून पुन्हा भूमिपूजन केले. आणि काम सुरू करायला हिरवा कंदील दाखवला.
मात्र हे काम सुरू होण्याअगोदर प्रवाशासाठी पर्यायी व्यवस्था होणे अत्यंत गरजेचे होते. पोलीस प्रशासनाच्या नोंदणी नुसार दररोज जवळपास 28,100 इतके प्रवासी दररोज उदगीर वरून ये जा करतात. उदगीर हे महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्रा, तेलंगणा या चार राज्याच्या सीमेवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेही विकसित झालेली आहे. पर राज्यातूनही प्रवासी येत जात असतात, मात्र त्या सर्वांची गैरसोय होत आहे. बस स्थानकावर ठीक ठिकाणी खड्डे पडले असून त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे महिला प्रवासी प्रवासासाठी आल्यानंतर त्यांच्या अंगावर चिखल उडत आहे. महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी तिकीटामध्ये दिलेल्या सवलतीमुळे मोठ्या प्रमाणात महिला प्रवासासाठी एसटी महामंडळाला प्राधान्य देतात. त्यामुळे महिलांची गर्दी जास्त दिसून येत आहे. असे असूनही महिलांसाठी ज्या सुविधा बसस्थानकावर अपेक्षित आहेत, त्या या ठिकाणी उपलब्ध नाहीत. आणखी पावसाळा पुढे असल्यामुळे मोठ्या पावसापूर्वीच पर्यायी व्यवस्था करून द्याव्यात. अशी मागणी प्रवाशांची आहे. इतर वेळा श्रेय घेणारे पुढारी यावेळेस मात्र सोयीस्करपणे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. याबद्दल प्रवासी वर्गात चीड निर्माण होत आहे.