छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी शिक्षणावर विशेष भर दिला – प्राचार्य डॉ. सुधीर जगताप
उदगीर (एल.पी.उगीले) : छत्रपती राजश्री शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते.आपल्या कार्यकाळात त्यांनी समानता प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.त्यांचे सामाजिक सुधारणाचे कार्य हे देशासाठी आजही दिशादर्शक आहेत, त्यांनी कला,क्रीडा,कृषी, आरोग्य, समाज सुधारणा, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रासाठी दिलेले योगदान अनन्य साधारण आहे. त्याचबरोबर त्यांचे शिक्षण विषयक विचार व कार्य देशात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. असे वक्तव्य स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांनी केले.
येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागामार्फत आज छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची 149 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुधीर जगताप बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. सुधीर जगताप असे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत केले. बहुजनांचे मुले-मुली शिकली पाहिजेत. सर्वांना समान शिक्षण मिळावे. यासाठी त्यांनी सोनतळी येथे भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना दंड ठोकणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होते. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला होता.पुढे परदेशात शिक्षण घेण्यासाठी डॉ. आंबेडकरांना शिष्यवृत्ती ही दिली. यावरून त्यांचे शिक्षण विषयक विचार,दृष्टिकोन किती व्यापक होता हे लक्षात येते. त्यांनी देशात सर्वप्रथम आरक्षण लागू केले. त्यामुळे त्यांना आरक्षणाचे जनक म्हणून देखील संबोधले जाते. बहुजन,मागासलेल्या, तळागळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे ते म्हणत. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार देखील त्यांनी केला होता.त्याचबरोबर विद्यार्थीसाठी वसतिगृह बांधली. असे ही ते म्हणाले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक डॉ. शेषनारायण जाधव होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे यांनी तर सूत्रसंचालन पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांनी केले. यावेळी प्रा. आकाश कांबळे, प्रा. ऋतुजा दिग्रसकर, प्रा.सोनल सोनफुले,प्रा. राखी शिंदे, योगेश जगताप इ. उपस्थित होते.