पोलीस अधीक्षकांनी घेतली आषाढी एकादशी व बकरीईद अनुषंगाने विविध विभागाचे अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक संपन्न

पोलीस अधीक्षकांनी घेतली आषाढी एकादशी व बकरीईद अनुषंगाने विविध विभागाचे अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : आषाढी एकादशी, बकरी ईद व आगामी इतर सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर मध्ये शांतता कमिटी सदस्य, मोहल्ला कमिटी, सामाजिक व राजकीय लोकप्रतिनिधी आदींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

येत्या 29 जूनला एकाच दिवशी आषाढी एकादशी व बकरी ईद सण आला आहे.त्या पार्श्‍वभूमीवर पोलीस ठाणे स्तरावर शांतता कमिटी आणि मोहल्ला कमिटीच्या बैठका घेण्यात येत आहेत.

सण- उत्सवा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी. तसेच सोशल मीडियावर कोणताही आक्षेपार्ह अथवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर आढळल्यास त्याबद्दलही पोलिसांना त्वरित माहिती द्यावी. कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावणार्‍या आक्षेपार्ह पोस्ट्स, मेसेज, स्टेटस शेअर करू नयेत अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

तसेच बकरी ईद संदर्भाने महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियम अटींची सर्व समाज बांधवांनी पालन करावे. कोणत्याही खाजगी व्यक्तीला कोणत्याही गाडीला किंवा वाहनाला तपासण्याचा, नाकाबंदी अथवा पाठलाग करण्याचा अधिकार नाही. जर एखादे वाहन जनावराची वाहतूक करीत असेल आणि तो प्रचलित अधिनियमांचे उल्लंघन करीत असेल अशावेळी कायदा हातात न घेता पोलिसांशी संपर्क साधावा. कारवाईचा अधिकार पोलीस प्रशासनाला व शासनाला असून पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येईल. कोणत्याही खाजगी व्यक्तीने कसल्याही प्रकारची कार्यवाही करू नये.

तसेच मुस्लिम बांधवांनी मान्यता असलेल्या जनावराचीच वाहतूक करावी, प्रतिबंध असलेल्या जनावराची वाहतूक करू नये, किंवा त्याची कुर्बानी करू नये. जनावरांची वाहतूक करीत असताना प्रचलित कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

समाजातील विविध व्यक्तींनी आपापले सण-उत्सव साजरे करीत असताना इतरांच्या भावना दुखावणार नाहीत किंवा एक दुसऱ्याला अडथळा पोहोचणार नाही असे वर्तन करून सामाजिक एकोपा कायम ठेवावा.

यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर दिलीप भागवत, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार , सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभागाचे पी एन धोंड, डॉक्टर घोणसीकर, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी असे प्रशासकीय अधिकारी तसेच माजी आ. मनोहर पटवारी, माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे, उदगीर एम आय एम प्रमुख सय्यद ताहेर हुसेन, माजी नगरसेवक इमरोज हाश्मी, समीर शेख, विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष महादेव गोणे विश्वनाथ गायकवाड, मौलाना हबीबउ्र रहेमान, मौलाना नौशाद कास्मी असे उपस्थित होते.

About The Author