बहुजनाचे जननायक राजर्षी शाहू महाराज – प्रा.जिगाजी बुद्रुके

बहुजनाचे जननायक राजर्षी शाहू महाराज - प्रा.जिगाजी बुद्रुके

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने सोमवार दि.26 जून 2023 रोजी मानवतेचे शिल्पकार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मा. श्री नागेश मापारी, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक आणि प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने महाविद्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.

राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य अठ्ठावीस वर्षांचे असून ते अठ्ठावीस युगे टिकणारे आहे. राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने बहुजनांचे जननायक होते असे प्रतिपादन प्रा.जिगाजी बुद्रुके यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी यासाठी क्रांतिकारक निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलन, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण, वसतीगृहाची सुविधा, स्त्रियांच्या प्रगतीसाठी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन अशा विधायक कार्याद्वारे सामाजिक न्यायाचा महामेरू उभा केला असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड हे होते. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मा. श्री नागेश मापारी, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक, लातूर, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. सुनील साळुंके, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, कार्यालयीन अधीक्षक रुपचंद कुरे तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी आदी उपस्थित होते .

About The Author