तलाठ्यांनो पेरणीच्या मौसमात मुख्यालयी रहा अन्यथा स्पॉट पंचनामा करणार .. डॉ भिकाणे
अहमदपूर( गोविंद काळे ) पेरणीच्या दिवसातही अनेक तलाठी सज्जावर राहत नसल्याने शेतकऱ्यांना व जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.यासाठी अनेक निवेदने देऊन ही तहसीलदार त्यांना पाठीमागे घालण्याची भूमिका घेत आहेत याचा निषेध नोंदवत मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या तालाठ्यां विरोधात येणाऱ्या आठवड्यात धरणे आंदोलन व त्यानंतरही सुधारणा नाही झाली तर बेजबाबदार तलाठ्यांचा प्रशासनासह सज्जावर जाऊन स्पॉट पंचनामा करणार असल्याचा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.याच विषयावर मनसे शिष्टमंडळाने तहसिलच्या पायऱ्यावर काही वेळ ठिय्या दिला व नंतर निलंगा तहसीलदार यांना निवेदनही दिले.अनेक तलाठी हे मुख्यालयी राहत असल्याचे भासवून शासनाचा कोट्यवधीचा निधी लाटत शासनाची फसवणूक करत आहेत.यासाठी एकतर त्यांचे मुख्यालयी राहणे कंपलसरी करावे वा घरभाडे देणे बंद करावे जेणेकरून जनतेचे कोट्यवधी रुपये वाचतील व त्या पैस्यांचा विकासकामांसाठी वापर होईल.सद्या पेरणीचा मौसम आहे,शेतकऱ्यांना सतत तालाठ्यांकडे काम पडते किमान जनाची नाही तर मनाची शरम बाळगून त्यांनी मुख्यालयी राहावे असेही डॉ भिकाणे म्हणाले.यावेळी तालुकाध्यक्ष सुरज पटेल,जिल्हाउपाध्यक्ष प्रदीप शेळके,तालुकाउपाध्यक्ष कृष्णा सुरवसे,सुभाष कांबळे, विकास सूर्यवंशी,प्रदीप माने,बालाजी पवार,वैभव काळे,सुशील व्हरगले,विष्णू पवार,दत्ता शिंगरूपे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.