कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 125 माॅडीफाय सायलेन्सर्स व कर्णकर्कश हॉर्नचा पोलिसांकडून चुराडा
लातूर (एल.पी.उगीले) : शहरामधून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर सह मॉडीफाय सायलेन्सर वापरू नये अशा पद्धतीच्या सूचना लातूर जिल्हा पोलिसांनी दिल्या होत्या. अशा कर्णकर्कश सायलेन्सर आणि हॉर्न मुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता. पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या 125 दुचाकी सरांच्या गाड्यांचे मॉडीफाय सायलेन्सर आणि कर्ण कर्कश हॉर्न लातूर पोलिसांनी जप्त केले होते, ते हॉर्न रोलरच्या साह्याने चुराडा करून टाकले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकींना मॉडीफाय केलेले सायलेन्सर, हॉर्न लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणारे दुचाकीस्वार सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत हॉस्पिटल्स,शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी कर्णकर्कश हॉर्न, मॉडीफाय सायलेन्सरने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण करत फिरतात. शिवाय या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या माॅडीफाय सायलेन्सर्स व कर्णकर्कश हॉर्नचा अनेकांना विनाकारण त्रासही होतो.
दुचाकीवरून हवा करत फिरणाऱ्या अशाच अतिउत्साही युवकांची हवा काढण्याची व त्यांना मोटार वाहन अधिनियम कायद्याचा पाठ शिकवण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांचे नेतृत्वात वेळोवेळी वाहतूक नियंत्रण शाखेकडून कार्यवाही करण्यात येत आहे. मॉडीफाय सायलेन्सरला आळा घालण्यासाठी लातूर पोलिसांकडून विविध मार्गाने उपाय योजना करण्यात येत आहेत.
मॉडीफाय सायलेन्सरचे फोटो काढून पोलिसांना कळविणाऱ्यांना सवलतीचे कुपन वाटप, ट्राफिक अँबेसिडर तसेच रोटरी क्लब व सेवाभावी संस्थांच्या माध्यमाने जनजागृती, पथनाट्याचे आयोजन करण्यात येते आहे. तरीही काही अतिउत्साही युवक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करून मॉडीफाय सायलेन्सर, कर्णकर्कश हॉर्न वापरताना आढळून येतात. अशा मॉडीफाय सायलेन्सर,कर्णकर्कश हॉर्न वापरणाऱ्या दुचाकीवर कार्यवाही करून वाहतूक शाखेकडून दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. परंतु दंडात्मक कार्यवाही करूनही काही दुचाकीस्वार परत-परत मॉडीफाय सायलेन्सरचा वापर करीत असल्याने वाहतूक पोलिसांकडून ते जप्त करण्यात येत आहे.
अशाप्रकारे कार्यवाही करत वाहतूक नियंत्रण शाखेकडून मागील 3 महिन्याच्या काळात 125 नियमबाह्य मॉडीफाय सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. ते 125 नियमबाह्य/ मॉडीफाय सायलेन्सर, कर्णकर्कश हॉर्न पंचा समक्ष रोडरोलर चालवून नष्ट करण्यात आले असून ते भंगारात विकून त्यातून मिळालेले पैसे शासनास जमा करण्यात आलेले आहेत.
दुचाकींना कर्कश मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून फिरणाऱ्या वाहनांवर 125 मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करत, हे माॅडीफाय सायलेन्सर,कर्णकर्कश हॉर्न ताब्यात घेतले होते. इतकंच नाही तर काढून टाकलेल्या सायलेन्सरचा, हॉर्नचा पुनर्वापर होऊ नये म्हणून ते रोडरोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आले आहे. या अगोदरही अशाच प्रकारे 150 मॉडीफाय सायलेन्सर जप्त करून नष्ट करण्यात आले होते.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा ठाकूर व त्यांच्या पथकाने केली आहे.