अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर!

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर!

लातूर (एल.पी.उगीले) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला जळकोट तालुक्यातील एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. शासनाने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार एन डी आर एफ निकषापेक्षा जास्त दराने ही मदत देण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
जळकोट तालुक्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर रावणकोळा येथे शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधताना ना. बनसोडे बोलत होते. सरपंच सत्यवान पाटील, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांच्यासह विविध विभागांचे तालुकास्तरीय प्रमुख यावेळी उपस्थित होते.जळकोट तालुक्यातील घोणसी मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार ७८० शेतकऱ्यांच्या जवळपास तीनशे हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड, जनावरे वाहून जावून, घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्तांना शासकिय मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल, असे ना .संजय बनसोडे यांनी सांगितले. तसेच अजूनही कोणत्या नुकसानीचे पंचनामे राहिले असल्यास ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.मरसांगवी गावाजवळील दोन्ही पुलांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले असून या पुलाची, तसेच नुकसानग्रस्त सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना ना. बनसोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मरसांगवी गावाजवळ बॅरेज कम पूल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असून यामुळे लोकांना रस्ता उपलब्ध होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. अतनूर ते गव्हाण रस्त्यावरील पुलाचेही पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले असून या पुलाचीही ना. बनसोडे यांनी पाहणी केली. तसेच मरसांगवी, अतनूर येथील शेतीच्या नुकसानीचीही पाहणी केली.
घोणसी महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे झाल्याने झालेल्या नुकसानीची उपविभागीय अधिकारी श्री. शिंदे यांनी यावेळी माहिती दिली.

About The Author