पालकांनो,पाल्याला कष्टापासून दूर ठेऊ नका – डॉ .विठ्ठल लहाने
उदगीर (एल.पी. उगिले) : स्पर्धा ही पूर्वीही होती,आजही आहे आणि उद्याही असणार आहे.स्पर्धेचा बागुलबुवा तयार करून पाल्यांना कष्टापासून दूर ठेऊ नका,लेकरांना कष्ट करु द्या. ”कष्टाची सवय” हा यशस्वी जिवनाचा पाया आहे. असे प्रतिपादन प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी व्यक्त केले.आव्होपाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष बाळकृष्ण मुक्कावार होते. व्यासपीठावर सेंट्रल बँक आॕफ इंडियाचे सिनीअर मॕनेजर अच्च्युत दमकोंडवार,संगणकतज्ञ उदय देशपांडे ,अव्होपाचे संस्थापक प्रा.डॉ .दीपक चिद्दरवार,अध्यक्ष प्रा.संजय चन्नावार,सचिव विजयकुमार गबाळे,प्रकल्प प्रमुख बालाजी बुन्नावार,सोमनाथ पारसेवार इत्यादी मान्यवरउपस्थित होते.
बालाजी बंडेवार व संचाने सादर केलेल्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रा.डॉ .दीपक चिद्दरवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.”अभ्यास हा यशस्वी जिवनाकडे नेतो. मात्र त्यासाठी ध्येय पक्के असायला हवे,ध्येय पक्के असेल तर विचलितपणा येत नाही, त्यामुळे ध्येयनिश्चिती महत्त्वाची आहे, असे ते पुढे बोलताना म्हणाले.ध्येय बुलेटप्रुफ असेल तर यशाचा मार्ग सुकर होतो असे डॉ .लहाने पुढे बोलताना म्हणाले.गुणवंत विद्यार्थी व दानशूर व्यक्तीमत्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमांमध्ये सोमनाथ पारसेवार यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस गरजू मुलींना शालेय साहित्य वाटप करून साजरा केला. तसेच गरजू विद्यार्थ्यांला सायकल भेट देण्यात आली. डॉ .लक्ष्मीकांत पेन्सलवार,धनंजय गुडसूरकर ,उदय देशपांडे, प्रा.संजय चन्नावार,बाळकृष्ण मुक्कावार यांची भाषणे झाली.प्रा.संजय संगुळगे,संजय पत्तेवार,अनिल मारमवार,संतोष मुर्के यांनी सूत्रसंचालन तर राकेश पांपटवार यांनी आभार मानले.