शेतकऱ्यांना सहकार्य करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था कर्तबगार असल्यामुळे शेतकऱ्यांचे कल्याण शक्य – दिलीपराव देशमुख

शेतकऱ्यांना सहकार्य करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था कर्तबगार असल्यामुळे शेतकऱ्यांचे कल्याण शक्य - दिलीपराव देशमुख

उदगीर (एल.पी.उगीले) : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत, त्यामध्ये प्राधान्य क्रमाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्ह्यातील साखर कारखानदारी आणि शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ठरवणारी बाजार समिती, या तिन्ही संस्था लातूर जिल्ह्यात पूर्ण ताकतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ निर्माण करणे शक्य झाले आहे. या त्रीसूत्रीतूनच शेतकरी भाग्यवान ठरू शकतो.असे विचार सहकार महर्षी माजी राज्यमंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील संगमेश्वर मंगल कार्यालयात उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी ऋणनिर्देशक मेळावा आणि वैशालीताई देशमुख बालिका बचाव योजनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते.

या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून माजी पालकमंत्री अमित भैय्या विलासराव देशमुख हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार धीरज भैया देशमुख, श्रीशैल उटगे यांच्यासह काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या उषाताई कांबळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका लक्ष्मीताई चंद्रशेखर भोसले आणि बाजार समितीचे संचालक मंडळ व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना दिलीपराव देशमुख यांनी स्पष्ट केले की, स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांनी उदगीर परिसरामध्ये काँग्रेसच्या विचाराची निष्ठावंत फळी निर्माण केली होती. ती फळी आजही सक्षमपणे काँग्रेस सोबतच आहे. कोण इकडे आले? कोण तिकडे गेले? याबद्दल चर्चा करत बसण्यापेक्षा जनसामान्यांचा विचार आणि त्यांचे प्रश्न घेऊन काँग्रेस पुढे येत आहे. आता मतदारांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. 70 वर्षात काहीच झाले नाही म्हणणाऱ्याचे पितळ उघडे पडू लागले आहे. प्राधान्याने समाजवादी विचारधारा आणि हिंदुत्ववादी विचारधारा अशा पद्धतीची चर्चा जरी केली जात असली तरी आम्ही देखील हिंदूच आहोत, आमचे हिंदुत्व हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि इतरांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आहे. इतरांची घरे उध्वस्त करणारे हिंदुत्व या देशाला परवडणारे नाही. त्यासाठी मतदारांनी पुढे येणे गरजेचे आहे. जे चांगले आहे ते टिकवले पाहिजे.

बाजार समितीमध्ये आपण पाहतो, शेतकऱ्यांच्या माला सोबत मातेरी येते, मात्र आपण ते मातेरे बाजूला काढून ज्या पद्धतीने निवडक माल वेगळा करतो, तशाच पद्धतीने आता योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन राष्ट्रहिताचा विचार करावा लागणार आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेकारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, युवकांना शासकीय नोकऱ्या भेटत नाहीत. या गोष्टी गंभीर आहेत. याची जाणीव जनतेला करून देणे गरजेचे आहे. हात चालाखी करून जादूगिरी दाखवणाऱ्या जादूगाराच्या गप्पा वर भाळण्याचा काळ आता राहिला नाही. लोकांनी सावध होऊन हात चालाकी करणाऱ्यांना जागा दाखवा. इमारती बांधण्यासाठी निधी कोणीही आणेल, मात्र शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जावेत असा विचार करणारी विचारधारा काँग्रेसचीच आहे.

बाजार समिती सक्षमपणे शेतकऱ्यांच्या सोबत असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. अशा पद्धतीच्या लोककल्याणकारी योजना बाजार समितीच्या वतीने सुरू केला जात आहेत, हे अभिनंदन या बाब आहे. असेही सांगितले. आम्ही केवळ भाषण करून जाणार नाही तर उदगीरकर आमचे लहान भाऊ असल्याने उदगीरचा विकास करण्याचा दृष्टीने आम्ही सदैव प्रयत्न करणारे आहोत. बाजार समितीला जागा पुरत नाही ही गोष्ट मान्य आहे. येणाऱ्या काळात पन्नास एकर जागा घेऊन त्या जागेवरही नवीन बाजार समिती सुरू करावी आणि ही जुनी ही येथे चालू राहू द्यावी, असेही सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव मुळे, कल्याणराव पाटील, श्री शैल्य उटगे यांचीही भाषणे झाली.

उद्घाटक आ. अमित भैया देशमुख यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, उदगीरची कृषी उत्पन्न बाजार समिती आणि देशमुख परिवार यांचे एक अतूट असे नाते निर्माण झाले आहे. शिवाजीराव हुडे यांनी पहिल्यांदाच भाषण केले आणि त्या भाषणात अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीचे विचार मांडले. कारण शिवाजीराव हुडे यांनी सांगितले की, आम्ही विलासरावजी देशमुख साहेबांच्या विचारांना धरून एकनिष्ठपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत. ही एकनिष्ठता अत्यंत महत्त्वाची आहे. नाहीतर आजच्या राजकारणामध्ये मतदारांना गृहीत धरून चालणाऱ्याची संख्या वाढली आहे. एकदा का मतदान झाले, आम्ही निवडून आलो की, आम्ही मतदाराला गृहीत धरून वागायला लागतो. उदगीरऊन मुंबईला जाताना एका नेत्याचा झेंडा आणि मुंबईहून उदगीर येथे येताना दुसऱ्याच नेत्याचा झेंडा घेऊन येणारे जनतेशी इमान काय राखणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

एक वेळेस विलासरावजींना देखील काँग्रेस पक्षाने निलंबित केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले होते की, काँग्रेसने तुम्हाला काढले. आता तुम्ही काय करणार ? त्यावेळेस स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी सांगितले होते, काँग्रेसने मला काढले असले तरी माझ्या रक्तातील काँग्रेस कशी काढणार? त्यांच्यातील ही निष्ठा आणि विश्वास विचारात घेऊन काँग्रेसने त्यांना स्वगृही घेतले, त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले आणि काँग्रेसला सतत पुढे घेऊन ते जात राहिले. तीच एकनिष्ठता पाहायची असेल तर दिलीपरावजी देशमुख साहेबाकडे पाहता येऊ शकेल. कार्यकर्त्यांनी डळमळीत न होता आत्मविश्वासाने महाविकास आघाडीच्या सोबत राहावे. येणारा काळात लोकसभा, विधानसभा आणि इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या निवडणुका आपण काँग्रेसचा विचार घेऊनच लढणार आहोत. त्यामुळे तत्व जपणे जास्त गरजेचे आहे. उदगीरच्या जनतेने काँग्रेसची विचारधारा विचारात घेऊन यापूर्वी आमदार निवडून दिला. मात्र ते पुन्हा महायुतीच्या विचाराकडे गेले, अशा धरसोड प्रवृत्तीला कोणतीही वैचारिक अधिष्ठान नसते. विचारांची बैठकी नसते, स्वार्थाच्या पलीकडे ते लोक काही पाहत नसतात. काँग्रेसचा विचार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येणे महत्त्वाचे असल्याने आपल्या विचारासोबत जनता आहे. त्यामुळे आपण एकजुटीने लोककल्याणाच्या योजना सुरू करून आपला आदर्श दाखवून देऊ या. येणाऱ्या काळात इंडिया विरुद्ध एनडीए अशी लढत होणार आहे. त्यामुळे तत्वाला प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे. या ठिकाणी उपस्थित असलेले विविध विकास कार्यकारी सोसायटीतील चेअरमन असतील, संचालक असतील किंवा ग्रामपंचायतीचे सरपंच किंवा सदस्य असतील त्यांनी जनतेच्या प्रश्नांची नाळ कायम ठेवून प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्यावा. आम्ही कायम आपल्या सोबत आहोत. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अनेक उत्कृष्ट योजना राबवल्या आहेत, तशा योजना उदगीर बाजार समितीने ही राबवाव्यात. आणि उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने राबवलेल्या उत्कृष्ट योजना लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने राबवाव्यात. जेणेकरून चांगुलपणात सर्वत्र आपल्याला दिसून येईल, असेही सांगितले.

याप्रसंगी धीरज भैय्या देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की, ज्या युवक कार्यकर्त्याकडे योग्य गुण आहेत. त्यांना योग्य ठिकाणी संधी देण्याची सतत धडपड ज्येष्ठ नेते दिलीपरावजी देशमुख साहेबांचे असते. त्याची जपणूक करून काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेल्या सर्वांनाच आपण पुढे घेऊन जाणार आहोत. आपण लोकांची सेवा करण्यासाठी, लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ता म्हणून काम करतो. सामान्य माणूस गोरगरीब, दीन दुबळा, विविध विवांचनेने आडलेला माणूस याच्यासाठी काँग्रेस कार्य करत राहते. आपली लढाई ही सत्तेसाठी नाही लोकांच्या प्रश्नासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. याची जाण कार्यकर्त्यांनी ठेवावी. राहुलजी गांधी यांनी युवक म्हणून मला संधी दिली आणि ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करू शकलो. सत्तेत आलो ते लोकांच्या हक्कासाठी आलो, याची जाण ठेवून मी काम करतो. जेव्हा केव्हा भावी निवडणूक लागतील त्यावेळेस सत्तेसाठी लुडबुड करणाऱ्यांना आपण योग्य जागा दाखवून द्यावी. आणि आपण मात्र जनतेच्या प्रश्नासाठी लढा ऊभारावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गोविंदराव भालेराव, प्रवीण जाहूरे, पद्माकर उगीले यांनी तर आभार मधुकर एकुर्केकर यांनी केले.

प्राध्यापक शिवाजी मुळे हे राष्ट्रवादी “मूळ”

आपल्या भाषणात सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी संजय बनसोडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात शरद पवारांना सोडून अजित दादा पवार यांच्या गटात जाण्याबद्दल नाम उल्लेख टाळून टीका केली. याप्रसंगी बोलताना आडनाव हे उगीच पडत नसतात. त्यामागे काहीतरी ठोस भूमिका असते. जसे की शिवाजीराव “मुळे” हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे मूळ असल्यामुळे ते कायम शरद पवारांसोबतच राहणार… बाकी सोडणारे सोडत राहतील, सोडणार यांची नावेही तुम्हाला माहिती आहेत. असे म्हणतात सभागृहात एकच अशा पिकला. दिलीपरावजी देशमुख यांनी ना. संजय बनसोडे यांच्या आडनावातील “सोडे” या शब्दावर कोटी केले.

उषाताई जागा रिकामी झाली आहे

आपल्या खुमासदार शैलीतून उदगीरचे आमदार विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी काँग्रेसचा विचार सोडून महायुतीचा विचार स्वीकारल्यामुळे आता उदगीर विधानसभेची जागा आपल्यासाठी रिकामी झाली. ही जागा राखीव असल्यामुळे उषाताई कांबळे यांच्या कडे पाहून त्यांनी स्मित हास्य करताच, सभागृहात टाळ्या पडल्या. उदगीरच्या जनतेने काँग्रेसची विचारधारा गृहीत धरून यापूर्वी आमदार निवडून दिला होता. त्यामुळे जनता आपल्या सोबतच असल्याचेही आमदार अमित देशमुख यांनी सांगितले. जणू-अप्रत्यक्षपणे उषाताई कांबळे यांना कामाला लागा असा इशाराच त्यांनी याप्रसंगी दिला अशी चर्चा जनतेत आहे.

About The Author