जिल्हा परिषद शाळेतील उर्दू विभाग बंद करून मराठी विभाग पूर्वत चालू करा – व्यंकट वाघमारे
उदगीर (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषद प्रशाला (मुले) कधीकाळी एक प्रख्यात शाळा म्हणून नावाजलेली असताना, जिल्हा परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि शिक्षकांच्या उदासीनतेमुळे सद्यस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील आठवी, नववी, दहावी हे तिन्ही वर्ग शेल्हाळ शाळेला वर्ग करण्यात आले आहेत. तर प्राथमिक विभागातील वर्गासाठी उर्दू विभाग सुरू करून मराठी विभागावर अन्याय केला जातो आहे. हे तात्काळ थांबवावे. उर्दू विभाग इतरत्र वर्ग करून जिल्हा परिषद मराठी प्रशाला म्हणूनच चालू होती, ती तशीच चालू राहावी. गेल्या पन्नास वर्षापासून उदगीर शहरातील नामांकित शाळा असलेल्या या शाळेला उर्दू शाळा बनवण्याचा घाट कोणी घातला? अत्यंत कमी संख्या असताना देखील शासनाच्या तिजोरीवर जवळपास दर महा साडेसहा लाख भुर्दंड कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करून पॅंथर संघर्ष महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष व्यंकटराव वाघमारे यांनी उपसंचालक, शिक्षण विभाग लातूर यांच्याकडे लेखी निवेदन करून उर्दूच्या नावावर चालू असलेले लाड तात्काळ थांबवावेत, आणि पूर्ववत मराठी शाळा चालू करावी. अशी मागणी केली आहे. तसेच या शाळेमध्ये चालू असलेल्या एकूण गैरव्यवहाराची ही कसून चौकशी केली जावी. असेही मागणी शिक्षण विभागाकडे केली असून त्याची प्रत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी लातूर, मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक लातूर, उपजिल्हाधिकारी उदगीर, गटविकास अधिकारी पंचायत समिती उदगीर, गटशिक्षणाधिकारी उदगीर यांना देण्यात आले आहेत. आपल्या मागणीची दखल नाही घेतल्यास, 14 सप्टेंबर पासून तीव्र आंदोलन केले जाईल तसेच आमरण उपोषणाचा मार्गही अवलंबला जाईल असा इशाराही व्यंकट वाघमारे यांनी दिला आहे.