तोंडार येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

तोंडार येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील मौजे तोंडार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 15 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे त्यांना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यंतरानंतर शाळेतील पंधरा विद्यार्थ्यांना अस्वस्थता जाणवू लागल्यामुळे तसेच पोटात दुखू लागल्यामुळे त्यांनी आपल्या शिक्षकांना सांगितल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन त्या पंधरा विद्यार्थ्यांना तातडीने उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये अनिकेत वसंत जाधव (सहा वर्ष), सृष्टी ज्ञानेश्वर मालोदे (सहा वर्ष), रंगनाथ श्रीपती कुकडे (दहा वर्ष), आरती गंगाधर गायकवाड (आठ वर्ष), रिया किशोर गायकवाड (आठ वर्ष), पृथ्वीराज विजय चव्हाण (बारा वर्ष), अभिषेक वाघम्बर तेलंगे (सहा वर्ष), जुनेद जुबान शेख (अकरा वर्ष), यश सतीश जाधव (दहा वर्ष), नागनाथ किशोर गायकवाड (दहा वर्ष), गुरु नरसिंग दाजी (सात वर्ष), अनुजा शिवशंकर स्वामी (नऊ वर्ष), अंजली संतु राठोड (आठ वर्ष), विजय संजय राठोड (सात वर्ष), विजया संजय राठोड (सहा वर्ष) हे विद्यार्थी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार आणि आवश्यक असलेले वैद्यकीय उपचार डॉक्टर सी. एस. रामशेट्टे यांनी केले. या विद्यार्थ्यापैकी सहा विद्यार्थी अंतर्गत विभागात असून त्यांना ताप आहे, मात्र ते लवकरच दुरुस्त होतील, अशी आशा वैद्यकीय सूत्रांनी बोलून दाखवली आहे. खिचडीतून विषबाधा झाल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शालेय परिसरातील काही गावकऱ्यांनी सांगितले की, खिचडी मध्ये उपयोगात आणलेले हरभरे आणि तांदूळ हे निकृष्ट असून त्यामध्ये आळ्या आणि फुफुटे दिसून येत होत्या. सदरील खिचडीचे नमुने तपासणीसाठी सादर करण्यात आले आहेत. शाळेला मध्यंतराची सुट्टी एक ते दोन या वेळात असते. त्यादरम्यान विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजन घेतले. भोजनानंतर थोड्या वेळातच विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी तशी तक्रार शिक्षकाकडे केल्यानंतर त्यांना प्रभारी मुख्याध्यापक रणजीत फड यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. काही ग्रामस्थांचे या प्रकरणाची चौकशी केली जावी असे म्हणणे आहे, दरम्यान गटशिक्षणाधिकाऱ्यांना फोन लावून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

About The Author