तोंडार जिल्हा परिषद शाळेतील विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापकाचे निलंबन; चौकशीही होणार
उदगीर(प्रतिनिधी): उदगीर तालुक्यातील तोंडार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा प्रकरणी उदगीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शालेय पोषण आहारचे लेखाधिकारी यांनी भेट देवून अहवाल सादर केला आहे. याप्रकरणी या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रणजीत भानुदास फड यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच खिचडी शिजविणारी स्वयंपाकी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे.
तोंडार येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारातील खिचडी व हरभरा उसळ खाल्ल्यामुळे 87 पैकी 15 विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे दिसून आली होती. त्यांना तातडीने उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तसेच उर्वरित 72 विद्यार्थ्यांची तालुका आरोग्य अधिकारी यांनी शाळेत जावून तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले होते. उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.