बलात्कार प्रकरणातील आरोपीला तब्बल 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

बलात्कार प्रकरणातील आरोपीला तब्बल 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

लातूर (एल.पी.उगीले) : बलात्कार प्रकरणातील आरोपीला तब्बल वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या बहुचर्चित प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, गुन्ह्यातील आरोपी सागर बाबासाहेब उर्फ धनंजय सूर्यवंशी, (वय 32 वर्ष, राहणार निलंगा जिल्हा, लातूर) जवळच्या नात्यातील अल्पवयीन मुली सोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दोषी धरून कलम 376,(2), 354, 506 भारतीय दंड विधान संहिता व बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम 6, 8 ,12 प्रमाणे 20 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
थोडक्यात माहिती अशी की, पिडीतेच्या लातूर येथील राहत्या घरी तिचा जवळचा नातेवाईक आरोपी सागर बाबासाहेब उर्फ धनंजय सूर्यवंशी व त्याची पत्नी हे नोकरी निमित्त पीडितेच्या घरी राहण्यासाठी आले. त्यावेळी सन 2019 मध्ये पीडीता इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत होती. पिडीताला शाळेत सोडण्यासाठी व शाळेतून घरी घेऊन येण्यासाठी सदर आरोपी स्कुटीवर जात असे, तेव्हा तो पिडीतेच्या अंगाला वाईट भावनेने स्पर्श करायचा. पिडीतेने विरोध केला तेव्हा “तुझ्या आई-वडिलांचा माझ्यावर जास्त विश्वास आहे, मी तुझ्याबद्दल काहीही सांगून तुझी शाळा बंद करतो.” अशी धमकी देत असे. तसेच तिची आई, मावशी नोकरीला व भाऊ शाळेत गेल्यावर आरोपी हा पिडीतेला शाळेत न जाऊ देता आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असे, व त्याबद्दल घरी किंवा कोणास सांगितल्यास पीडितेची बदनामी करण्याची धमकी देत असे.
काही दिवसानंतर आरोपीच्या पत्नीची निलंगा येथे बदली झाल्याने आरोपी व त्याची पत्नी राहण्यासाठी निलंगा येथे गेले. त्यानंतर आरोपी हा पिडीतेच्या घरी कोणी नसताना वारंवार येऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असे. आरोपी पिडीते सोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवत असल्याने तिने सर्व हकीकत आई-वडिलांना सांगितली. त्यावरून आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 31/ 2020 कलम 376 (2)(एन) (एफ) 354(अ),506 भारतीय दंड विधान संहिता व बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम 6, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर सचिन सांगळे यांचे मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम, पोलीस अमलदार विशाल कोडे, मदतनीस महिला पोलीस अमलदार सुजाता कसपटे यांनी सदर गुन्ह्याचा अतिशय बारकाईने व जलद गतीने तपास करून आरोपी विरुद्ध भरपूर पुरावे गोळा करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
त्यावर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश लातूर श्री. बी. सी.कांबळे यांनी जलद गतीने प्रकरण चालवून सदर प्रकरणात निकाल दिला आहे.
सदर प्रकरणात पिडीतेचा जवाब व इतर साक्षीदाराच्या आधारावर न्यायालयाने आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकार पक्षाची साक्ष ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा न्यायालय, लातूर यांनी आरोपी सागर बाबासाहेब उर्फ धनंजय सूर्यवंशी यास पिडीतेचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी 20 वर्षाची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात विशेष शासकीय अभियोक्ता मंगेश महेंद्रकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली, त्यांना जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांचे सहकार्य लाभले. तसेच सध्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे हे सदर प्रकरणावर लक्ष ठेवून वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना करीत होते.
तसेच सदर प्रकरणाचे तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम, कोर्टपैरवी चे काम पाहणारे ज्योतीराम माने, महिला पोलीस अमलदार कलमुकले यांनी कोर्ट कामकाजात सहकार्य केले.

About The Author