स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, टेम्पो चोरीत 2 जणांना अटक. चोरलेले 1 आयशर टेम्पोसह 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धडाकेबाज कामगिरी सुरू केली असून एका नंतर एक गुणी उघड करत आहेत टेम्पो चोरीतील दोन आरोपींनाही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करून चोरीस गेलेला एक टेम्पो सह तीन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अमलदारांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्या अनुषंगाने सदर पथके चोरीच्या गुन्ह्याच्या माहितीचे संकलन करून तपास करीत असताना दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, लातूर शहरातील सारोळा रोड परिसरात एक व्यक्ती समोरच्या बाजूला क्रमांक नसलेला इटकरी रंगाचा आयशर टेम्पो घेऊन थांबलेला आहे. अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सारोळा रोड परिसरात येथे पोहोचून बातमीदारने सांगितलेल्या आयशर टेम्पो व टेम्पो जवळ थांबलेल्या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्यांचे नाव भरत शंकर चव्हाण, (वय 38 वर्ष, राहणार विलास नगर, लातूर सध्या राहणार करीमनगर लातूर.)असे असल्याचे सांगून त्यांच्या ताब्यातील आयशर टेम्पो बाबत विचारपूस करून माहिती घेतली असता, सदरचा आयशर टेम्पो हा सद्दाम उर्फ चांदपाशा तांबोळी, (वय 33 वर्ष, राहणार साळे गल्ली, साठ फुटी रोड, लातूर) याचे कडून खरेदी केल्याचे सांगितले.
सदर टेम्पोचे चेसी व इंजिन नंबर वरून तसेच टेम्पोच्या पाठीमागे असलेल्या क्रमांकावरून सदरच्या आयशर टेम्पो बाबत अधिक माहिती घेतली असता अंदाजे चार महिन्यापूर्वी पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 278/2023 कलम 379, 34 भादवि प्रमाणे दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आयशर टेम्पो असल्याचे निष्पन्न झाले.त्यावरून नमूद गुन्ह्यातील आरोपी नामेभरत शंकर चव्हाण, (वय 38 वर्ष, राहणार विलास नगर, लातूर सध्या राहणार करीमनगर लातूर),सद्दाम उर्फ चांदपाशा तांबोळी, (वय 33 वर्ष, राहणार साळे गल्ली, साठ फुटी रोड, लातूर) यांना नमूद गुन्ह्यातील चोरीच्या आयशर टेम्पो सह पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई अहमदपूर पोलीस करीत आहेत.सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख यांनी पार पाडली.