अंदर बहार जुगाराने घेतली गती !! हप्तेखोरीतच अडकली पोलिसांची मती!!!

अंदर बहार जुगाराने घेतली गती !! हप्तेखोरीतच अडकली पोलिसांची मती!!!

रोखठोक : अड. एल.पी.उगीले

उदगीर शहर आणि ग्रामीण भागात सध्या अवैध धंद्यांनी धुमाकूळ घातला आहे. जुगाराचे तर गल्लीबोळात अड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे अनेक गोरगरिबांची संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. या संदर्भात जेव्हा समाजातून ओरड व्हायला लागते, तेव्हा थातुर मातुर कारवाई करून आम्ही फार प्रमाणिक आहोत अशी चमकोगिरी करण्यात काही पोलीस पटाईत आहेत. वास्तविक पाहता हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत? हे सर्व जनता ओळखते. त्यामुळे “मी नाही त्यातली.. कडी लावा आतली”अशी ओरड करून स्वतःची कर्तबगारी सांगण्यात काहीजण मशगुल आहेत. सध्या गणेश चतुर्थीचे दिवस असल्याने त्या पद्धतीने अनेक गणेश मंडळाच्या पाठीमागे जुगाराचे डाव बसले जातात तशाच पद्धतीने गल्लीबोळातही खुल्लम खुल्ला जुगाराचे अड्डे सुरू झाले आहेत ही बाब पोलीस प्रशासनाला माहीत नाही अशी नाही केवळ चिरीमिरीच्या लालसेपोटी गोरगरिबाचे संसार उध्वस्त करणाऱ्या जुगारासारख्या अवैध धंद्याला चालना मिळत असेल तर हे कुठेतरी थांबले पाहिजे. परवाच उदगीर शहरातील जुन्या भागात एका अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी रोख ४० हजारांसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
या संदर्भात थोडक्यात माहिती अशी की,शहरातील हावगीस्वामी गल्लीतील एका पत्र्याच्या बंद घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भल्या पहाटे २ : २० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा मारून रोख ४० हजारांसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. तर याप्रकरणी एकूण चार जणांविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर शहरातील हावगीस्वामी गल्लीतील महादेव मंदीर समोर असलेल्या एका पत्र्याच्या बंद घरामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिली होती, रात्रंदिवस चालणाऱ्या या जुगारार्थ्याच्या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी सोमवारी पहाटे २ : २० वाजताच्या सुमारास अचानक छापा मारला असता ५२ पानी पत्त्यांवर अंदर बाहर नावाचा जूगार खेळताना व खेळवितांना आरोपी गुरुनाथ हावगीराव उप्परबावडे ( रा. हावगीस्वामी गल्ली उदगीर ) , सुनील दिलीप समगे ( रा. हावगीस्वामी गल्ली उदगीर ) श्रीकांत काशिनाथ कपाळे (रा. कपाळे गल्ली उदगीर ) , विजयकुमार बाबुराव उप्परबावडे ( रा. हावगीस्वामी गल्ली उदगीर ) हे मिळून आले. आरोपींच्या कब्जातील रोख रक्कम ४० हजार रुपये आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गजानन मारोतीराव पुल्लेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध गु.र.नं. २८२ / २३ कलम ४ व ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोह गोलंदाज हे करीत आहेत.
शहरातील एका छोट्या अड्ड्यावर एवढी मोठी धाड यशस्वी झाली आहे, कारण या ठिकाणी धाड पडावी म्हणून नागरिकांनी रेटा दिला होता. उदगीर शहरातील आणि शहरालगत अनेक ठिकाणी मोठमोठे चालू असल्याचीही खुलेआम चर्चा आहे. यामध्ये अंदर बहार तसेच तीन पत्ती आणि चित्तर ओळखले बक्षीस अशा स्वरूपातील अनेक जुगार चालत असल्याचेही चर्चा आहे. काही ठिकाणी तितली पणती नावाचा जुगारही लपून छपून चालू आहे अशी चर्चा चौकात चौकात चालू आहे.
उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे प्रभारी असताना पोलीस अधिकारी सुनील गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात गुन्हे प्रकटीकरण शाखा पूर्णपणे बरखास्त करून त्या कर्मचाऱ्यांना देखील इतर कर्मचाऱ्याप्रमाणे कर्तव्य वाटप केले होते, कारण डी.बी. पथकातील अर्थात गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचारी गुन्हे शोधण्याचे दूरच नको ते उपदव्याप करत फिरत असल्याचे त्यांनी ओळखले होते आणि ही शाखा बरखास्त केल्यानंतर उत्कृष्टपणे कार्य करून दाखवले होते म्हणजेच या शाखेच्या नावाने चार-पाच कर्मचाऱ्यांना विशेष सवलती देऊन इतर कामे करण्यासाठी मुभा दिल्याबद्दल पोलीस दलातीलच काही कर्मचाऱ्यांची होणारी नाराजी आपोआप टाळता येऊ शकते हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी प्रत्यक्ष करून दाखवले होते आणि त्याचे उत्कृष्ट असे फलित देखील त्यांना मिळाले होते. सद्यस्थितीत या पथकातील अनेक कर्मचारी हे अवैद्य धंदेवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसून त्यांना जणू प्रोत्साहन देतात की काय अशी शंका लोकांना येऊ लागली आहे कित्येक अड्ड्यावर या पोलिसांना जाता येताना लोकांनी पाहिले असल्याने या अवैध धंद्याला पोलिसांचेच आशीर्वाद आहेत की काय अशीही चर्चा चालू आहे.

About The Author