रामदास मोरतळे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू
उदगीर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास मोरतळे पाटील यांनी दि.20/09/2023 रोजी त्यांच्या गावी मोरतळवाडी (हळी) तालुका उदगीर, जिल्हा लातूर या ठिकाणी आमरण उपोषणाची सुरुवात केली आहे. यंदाच्या वर्षी मराठवाड्याची परिस्थिती पाहता जून महिन्यात पाऊस नसल्याने पेरण्या उशिरा जुलै महिन्यात झाल्या. जुलै महिन्यात जेमतेम पाऊस पडला. त्याचबरोबर संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यामुळे पिकाचे प्रचंड असे नुकसान झाले असल्यामुळे, शेतकरी बांधवावर हे मोठे अस्मानी संकट निर्माण झाले असताना, शासन मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन दिसत आहे. यंदा शेतीतील उत्पन्नावर उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही, त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्या शिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे शेतकरी हिताच्या मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात, यासाठी रामदास पाटील यांनी हे उपोषण सुरू केलेले आहे. त्या मागण्या पुढील प्रमाणे असून मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा., शेतकऱ्यांना 24 तास वीज मोफत देण्यात यावी.,हरीण, रानडुक्कर, निलगाई या वन्य प्राण्याच्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी सरकार घेत असलेले प्रतिगुंटा शंभर रुपयाची मदत अतिशय तोकडी आहे, यात वन विभागाला जाऊन अर्ज करण्याचाही खर्च निघत नाही. त्यामुळे वन्यप्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करावी. व वन्य प्राण्यांचा प्रतिबंध करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर तारेचे कुंपण देण्यासाठी मदत करावी. गतवर्षीचे नुकसानीचे अनुदान व चालू बाकीदार शेतकऱ्यांचे पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान तात्काळ देण्यात यावे., तेलंगाना मॉडलवर आधारित विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्याच्या पार्श्वभूमीवर दिलेला अहवाल त्वरित लागू करावा., 992 या सोयाबीनच्या वानाचे बोगस बियाणे यावर्षी लातूर जिल्ह्यात बीज उत्पादन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात विकले आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी. शेतकऱ्यांना शेतीकामादरम्यान होणाऱ्या अपघाती मृत्यू मयताच्या कुटुंबास पाच लक्ष रुपये अपघाती विमा शासनातर्फे सरसकट शेतकऱ्यांना लागू करण्यात यावा. या मागण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तरी शासनाने त्वरित सदरील मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. या मागणीसाठी शेतकरी ही पाठिंबा देत आहेत.