जग आनंदाच्या शोधात आहे- प्रा.मॅक्सवेल लोपीस

जग आनंदाच्या शोधात आहे- प्रा.मॅक्सवेल लोपीस

उदगीर (प्रतिनिधी)
शस्त्रास्त्राच्या स्पर्धेमुळे जगातील अनेक देश वाटेल त्या दिशेने नीतिमत्ता पायदळी तुडवून वाटचाल करीत आहेत. जागतिकीकरणात दिवसेंदिवस लोक आनंदापासून दूर जात आहेत. अशा काळात भारतीय तत्त्वज्ञानच खऱ्या अर्थाने आनंद देऊ शकते. कारण संपूर्ण जग आज आनंदाच्या शोधात आहे. असे विचार प्रा.मॅक्सवेल लोपीस यांनी व्यक्त केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि जागतिकीकरण या विषयावर मुंबई येथील नरसी मोनजी महाविद्यालयातील प्रा.मॅक्सवेल लोपीस यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर तर मंचावर उपप्राचार्य डॉ.अप्पाराव काळगापुरे, ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ उपस्थित होते. सुरुवातीला ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.जे.डी.संपाळे यांनी करून दिला.
पुढे बोलताना प्रा.मॅक्सवेल लोपीस म्हणाले, ‘हे विश्वचि माझे घर’ हे तत्व जीवनात आणल्यास खऱ्या अर्थाने वैश्विकीकरण होईल. आपण चंद्रावर जात आहोत, ही चांगली गोष्ट आहे, परंतु जमिनीवरील वसुंधरेचे रक्षण देखील केलं पाहिजे. व्यापाराच्या जागतिकीकरणात पर्यावरण नष्ट होत आहे. अशी खंत व्यक्त करत संयुक्त राष्ट्र संघाचे उद्दिष्ट त्यांनी विशद केले. यावेळी त्यांनी प्राचीन व इंग्रजी ग्रंथातले अनेक लेखकांचे, संतांचे संदर्भ देत भारतीय संस्कृती ही जगापुढे नेण्याची आवश्यकता आहे, असेही सांगितले.
भारतीय तत्त्वज्ञानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे आहे असे उपप्राचार्य डॉ.अप्पाराव काळगापुरे यांनी सांगितले.अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य एन.जी. एमेकर म्हणाले, प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान जगातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचल्यास जगात शांतता नांदेल.भारतीय संतांनी सर्वांच्या उन्नतीसाठी आनंदासाठी प्रार्थना केलेली आहे.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री राजकुमार बोयने व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन कु. साक्षी डोंगरे तर आभार ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ यांनी मानले.

About The Author