विद्यार्थ्यांनी सकस आहार, सकारात्मक विचार व शारीरिक विकासाकडे लक्ष द्यावे – डॉ. माधव चंबुले जनरल सर्जन
देवणी (प्रतिनिधी) : उदगीर श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालय, उदगीर येथे झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर येथील उदयगिरी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे प्रमुख डॉ.माधव चंबुले (जनरल सर्जन), विद्यालयाचे पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के,बालाजी मुस्कावाड, प्रा.नितीन पाटील हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. माधव चंबुले यांनी आपल्या जीवनातील शालेय जीवनातील आपला प्रसंग व पुढील शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांनी आपल्या भाषणात संस्थेचे अध्यक्ष मा.बसवराज पाटील नागराळकर यांनी अशा उदगीर शहरांमध्ये निसर्ग रम्य वातावरणामध्ये असे बहुमूल्य शिक्षण देण्याचे योगदान केले आहे याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. वर्तमान युगातील शिक्षण पद्धतीमध्ये दुर्लक्षित होत असलेला शारीरिक विकास याकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष व आजची शिक्षण पद्धती याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.याप्रसंगी विविध आजारांवर त्यांनी केलेल्या उपचारांचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यानंतर विद्यार्थ्याकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांना त्यांनी त्या प्रश्नाची पार्श्वभूमी लक्षात ठेवता योग्य ते उत्तर व मार्गदर्शन केले.पुढे बोलताना ते म्हणाले,डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा देत असताना आपल्या रुग्णांची सेवा करत आहोत या दृष्टिकोनातूनच विचार केला पाहिजे असे मत व्यक्त केले.अध्यक्षिय समारोपात विद्यालयाचे प्राचार्य वसंत कुलकर्णी यांनी डॉ.माधव चंबुले यांच्या वैद्यकीय क्षेत्रा बरोबरच सामाजिक कार्याबद्दल योगदान विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद येवरीकर यांनी केले. तर आभार श्रीकांत देवणीकर यांनी मानले.यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.