संत ज्ञानेश्वर विद्यालयात गणितातील गमती जमती
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात गणितातील गमती जमती हा एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाबुराव मारुती पांचाळ सेवानिवृत्त विस्तार अधिकारी, पंचायत समिती अहमदपूर तर प्रमुख अतिथी म्हणून हरिदासजी तम्मेवार सेवानिवृत्त केंद्रप्रमुख,ज्ञानोबा सुकरे विषय तज्ञ बीआरसी अहमदपूर, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना तोवर सह शाळेतील सर्व सहशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमतः आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ,पुष्पहार व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. संत ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतिमेचे पूजन करून गणितातील गमती जमती या कार्यक्रमास सुरुवात झाली. सेवानिवृत्त विस्ताराधिकारी बाबुराव पांचाळ सरांनी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर गणित विषय कसा सोपा आहे, गणितातील गमती जमती पाढे पाठांतर न करता ते कसे तयार करावेत .व ते कसे उपयोगात आणावे बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार अगदी सोप्या पद्धतीने कसे करावे हे अतिशय सहज व सोप्या उदाहरणाने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले .गणित विषय अवघड नसून सर्व विषयात गणित विषय सवघड आहे हे त्यांनी विविध उदाहरणावरून पटवून दिले .समसंख्या, विषम संख्या, वर्ग, घन हे अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. अधून मधून विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन पर गवळणी सादर केल्या. शिक्षकी पेशातून व विस्ताराधिकारी पदावरून सेवानिवृत्त होऊन 17 वर्षे झाली तरीही त्यांचा उत्साह आजही कायम दिसून येत होता. यावेळी राष्ट्रीय विज्ञान स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले.आभार युवराज मोरे यांनी मानले. शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.