क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र देशात नाही तर जगात नावारूपाला येईल – ना. संजय बनसोडे
उदगीर (प्रतिनिधी) : राज्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून राज्य शासन काम करीत आहे. राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असुन या विद्यापीठाच्या माध्यमातून हजारो खेळाडु घडणार आहेत. खेळाडुंच्या पाठीशी क्रीडा मंत्री म्हणून खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे भविष्यात क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र देशात नाही तर जगात नावारूपाला येईल. असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.ते उदगीर येथे आयोजीत राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेच्या उद्धाटन प्रसंगी उद्धाटक म्हणुन बोलत होते.
यावेळी अर्जुन पुरस्कारप्राप्त कुस्ती प्रशिक्षक काका पवार, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त प्रा. गणपतराव माने, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तहसीलदार रामेश्वर गोरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त धर्मपाल गायकवाड, दत्ता गलाले, पवनराज पाटील, तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत लोदगेकर, प्रा.प्रवीण भोळे, बाजार समितीचे संचालक वसंत पाटील, अनिल मुदाळे, फयाज शेख, सय्यद जानी, संगम टाले, बाळासाहेब मरलापल्ले, मलकापुरचे सरपंच गुरुनाथ बिरादार, मुकेश भालेराव, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, संदीप देशमुख, पोस्ते पोतदार लर्न स्कूलच्या जगदेवी पोस्ते, जयहिंद पब्लिक स्कूलचे प्रदीप भोळे आदी उपस्थित होते. उदगीर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले.या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, लातूर, पुणे, आदी ठिकाणाहुन कुस्तीपट्टु आले होते. पुढे बोलताना ना.बनसोडे यांनी, उदगीर शहरात लवकरच डे – नाईट फुटबाॅलचे सामने घेणार असल्याचे सांगून या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात खेळाडु आपल्या शहरात येणार असुन संबंध महाराष्ट्रात आपल्या उदगीरचे नाव जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथेही क्रीडा विद्यापीठ स्थापन केले जाणार असून यासाठी 656 कोटी रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. राज्यातील खेळाडूंच्या मदतीसाठी ऑलिम्पिक भवन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा विभागाने लक्षवेध योजना जाहीर केली असून यामध्ये विविध 12 क्रीडा प्रकारांच्या विकासावर भर देण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. पारंपारिक आदिवासी खेळांचा समावेशही क्रीडा प्रकारात करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उदगीर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत राज्यातील 8 विभागांमधून 14 वर्षांखालील विविध वजन गटातील 160 स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची विदेशात होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड होणार असुन त्यांना भविष्यासाठी ना.बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.अनिता येलमटे यांनी केले. यावेळी क्रीडा विभागाचे सर्व कर्मचारी, विविध क्षेत्रातील क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक यांच्यासह राज्यभरातुन कुस्ती प्रेमी व खेळाडु मोठ्या संख्येने उपस्थित होते.