कठोर मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे – फुल्ल आयर्न मॅन संदीप गुरमे
उदगीर (एल.पी.उगीले) मी विद्यार्थी अवस्थेमध्ये कठोर परिश्रम घेतले. शिवाजी महाविद्यालयाचा मी माजी विद्यार्थी होतो. या ठिकाणी अतिशय कडक शिस्त होती. एनएसएस, एनसीसी, सांस्कृतिक विभागातून मी सहभाग घेत गेलो. त्यामुळेच आज मला फुल्ल आयर्न मॅन होता आले. कठोर मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे. असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सतत दोन वेळा फुल्ल आयर्न मॅन होण्याचा सन्मान मिळवणारे शिवाजी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संदीप गुरमे यांनी व्यक्त केले. शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व आयक्वेशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सपत्नीक सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अरविंद नवले होते, तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विलास भोसले, कार्यक्रमाचे संयोजक डॉ एस व्ही शिंदे, प्रबंधक बी के पाटील यांची होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुढे बोलताना ते विद्यार्थ्यांना म्हणाले, मी सतत ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेत होतो, धडपडत होतो, मी अविरतपणे कष्ट घेत होतो. त्याचेच मला यावेळी फळ मिळाले. कारण ही स्पर्धा अतिशय कठीण असते. 5 ऑगस्ट 2023 मध्ये युरोप मधील इस्त्रोलियाची राजधानी टॅलीन येथे ही स्पर्धा पार पाडली होती. या स्पर्धेचे नियम म्हणजे 3.8 किलोमीटर समुद्रात पोहणे ,180 किलोमीटर सायकलिंग करणे आणि 17 तासाच्या आत 42.5 किलोमीटर धावणे हे तिन्ही क्रीडा प्रकार 17-18 अंश सेल्सिअस तापमानामध्ये करावे लागतात. हे कठीण काम गुरमे यांनी करून दाखवले. यासाठी त्यांनी दर आठवड्याला 300 किलोमीटर सायकलिंग,21 किलोमीटर धावणे व 7 किलोमीटर पुणे असा सराव केला होता.एवढेच नाही तर त्यांनी 2019 मध्ये विरळ ऑक्सीजन असलेल्या 6750 फोटो उंचीवरील मनाली ते लेह लडाख खारदुगला हे 550 किलोमीटरचे अंतर सायकलिंगने पार करून पराक्रम केला होता. आज त्यांनी दुसऱ्यांदा फुल आयर्न मॅन हा सन्मान प्राप्त केलेला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य अरविंद नवले यांनी करून दिला.त्यावेळी ते म्हणाले महाविद्यालयाने आमदार, खासदार ,कुलगुरू, संचालक एसपी, पी आय ,पी एस आय असे अनेक हिरे निर्माण केलेले आहेत. याच वेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विलास भोसले यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गुरमे यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले. यावेळी गुरमे यांनी हा सन्मान मिळवताना केलेल्या क्रीडा प्रकाराची चित्रफीत दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयक्वेसीचे प्रमुख डॉ व्ही एम पवार यांनी तर आभार उपप्रचार्य डॉ आर एम मांजरे यांनी मानले.