गांधीजींचे श्रमदान आणि तुकडोजी महाराजांच्या ग्राम स्वच्छतेचा मंत्र देशाला प्रगतीकडे नेईल – प्रा. नंदकुमार पटणे

गांधीजींचे श्रमदान आणि तुकडोजी महाराजांच्या ग्राम स्वच्छतेचा मंत्र देशाला प्रगतीकडे नेईल - प्रा. नंदकुमार पटणे

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये श्रमदान आणि स्वच्छता याला अन्यन्न साधारण महत्व दिले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गाव पातळीवरील विकासासाठी ग्रामगीता सांगताना, ग्राम स्वच्छतेचे महत्व सांगितले. या राष्ट्रसंताचा आणि महापुरुषांचा आदर्श ग्रामीण भागात जपला जाणे गरजेचे आहे. ग्रामविकासासाठी महात्मा गांधींनी खेड्याकडे चला, असा संदेश दिला होता. मात्र भौतिक सुख सुविधेकडे वळलेली नवी पिढी आधुनिकरणाला प्राधान्य देत, शहरीकरणाकडे आकर्षित झाली. त्यामुळे खेड्यांचा अर्थात ग्रामीण भागांचा विकास म्हणावा त्या गतीने झाला नाही. त्यासाठी पुन्हा महापुरुषांचे विचार डोळ्यासमोर आदर्श म्हणून ठेवून नव्या पिढीने काम करावे. असे आवाहन गुरदाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रा. नंदकुमार पटणे यांनी केले.
महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती आणि स्वच्छता मोहीम, श्रमदान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या विकासासाठी समर्पित जीवन जगणारे सरपंच वैजनाथ झुकलवाड हे होते. तसेच प्रमुख उपस्थितामध्ये महानंदाताई स्वामी, संगमाबाई पाटील, सुनीताताई मोरतळे, विठ्ठलराव पाटील आप्पा, प्रभूराव पाटील, मोहनराव पटवारी आप्पा, राम उडके, तुकाराम गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. नंदकुमार पटणे म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेने आपल्या विकासासाठी आपणच पुढाकार घेणे गरजेचे आहे. कोणीतरी येऊन आपला विकास करेल, हा विचार सोडून प्रत्येक गोष्ट स्वतःपासून सुरू केल्यास विकासाला वेळ लागणार नाही. कर्म धर्म संयोगाने सद्यस्थितीत उदगीर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी ना. संजय बनसोडे यांनी विकासात चांगलीच गती घेतली आहे. त्यात सहभागी होऊन आपल्या गावातील प्रश्न सोडवून घ्यावेत, आणि नव्या नव्या योजना प्रत्यक्ष राबवाव्यात, असेही आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप करताना सरपंच वैजनाथ झुकलवाड यांनी सांगितले की, ज्या गावांमध्ये एकोपा राहतो, सामाजिक बांधिलकी जपली जाते, एक दुसऱ्याच्या मदतीला आपण धावून गेले पाहिजे. ही भावना राहते, त्या गावाचा विकास कोणी थांबवू शकत नाही. हा आदर्श जपत जपत आपण महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या श्रमदानाच्या संकल्पनेतून गाव विकासाचा प्रयत्न करू या, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास ग्राम स्वच्छता आणि गावचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. आपण सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

About The Author