लिंगायत आरक्षण मिळावे म्हणून उपजिल्हाधिकारी यांना लिंगायत महासंघाचे निवेदन

लिंगायत आरक्षण मिळावे म्हणून उपजिल्हाधिकारी यांना लिंगायत महासंघाचे निवेदन

उदगीर (एल.पी.उगीले) : लिंगायत महासंघ महाराष्ट्र राज्य प्रांताध्यक्ष प्राध्यापक सुदर्शन बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली ना. एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना सरसकट लिंगायताना आरक्षण लागू करणे बाबत विनंती करणारे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात एक कोटी लोकसंख्या असलेल्या लिंगायत समाजाला 2014 साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ओबीसीचे आरक्षण जाहीर केले, महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला लिंगायत, हिंदू लिंगायत व वाणी नावाने ओळखले जाते. मात्र 2014 साली वाणी, लिंगायत वाणी या नावाला आरक्षण दिले गेले. त्याचा फायदा समाजातील खूपच अल्प लोकांना झाला. मात्र लाखोंच्या संख्येने जातीची नोंद लिंगायत, हिंदू लिंगायत असणाऱ्या लिंगायत वाणी समाजाला या आरक्षणाचा कसलाच फायदा झाला नाही. महसुली पुरावे शोधून आरक्षण मिळवण्या साठी आम्ही प्रयत्न केला, पुरावे न मिळाल्याने याही ठिकाणी समाजाच्या पदरी निराशाच आली. त्यानंतर समाजाची मागणी सरकारकडे चालूच राहिली. ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबर मुंबईत बैठका झाल्या, त्यांना सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली. एक महिन्यात सरसकट लिंगायताना आरक्षण देण्याचे फडवणीस यांनी कबूल केले होते. मात्र पाच वर्षे होत आहेत, अद्याप न्याय मिळाला नाही. वाणी नावाला जे ओबीसीचे आरक्षण लागू झाले आहे, ते लिंगायत, हिंदू लिंगायत या नावाने नोंद असणाऱ्या सरसकट लिंगायताना लागू होण्यासाठी शासनाने शुद्धिपत्रक काढावे, ज्यात वाणी, लिंगायत, हिंदू लिंगायत ही एकाच जातीची नावे आहेत, असा उल्लेख असावा. या निवेदनाद्वारे न्याय देण्याची विनंती करण्यात येत आहे. असे नमूद करण्यात आले आहे सदरील निवेदन देताना लिंगायत महासंघाचे प्रांत अध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार , महासंघाचे उदगीर तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिरसे, चंद्रकांत कालापाटील, बसवराज ब्याळे , शेरे सुभाष, शहराध्यक्ष अशोक तोंडारे, शहर संघटक उमाकांत द्याडे, सदस्य शेळके भीमाशंकर ,कालिदास शिरसे, बापूराव शेटकार ,संजय शिवशेट्टी, वडले राजकुमार, संतोष खरवडे, महेश धोंडीपरगेकर, संघशेट्टी बिरादार ,बापूराव पटणे ,शिवराज रंडाळे, शिवराज तोंडारे आदींची उपस्थिती होती.

About The Author