साहित्य जीवनाला जगण्याचं भान देते – डॉ दीपक चिद्दरवार
उदगीर (एल.पी.उगीले) : माणसाने नेहमी वाचत राहिलं पाहिजे. पुस्तक वाचल्यानंतर माणसे घडतात. पुस्तक मस्तक घडवतात. वाचाल तर वाचाल अन्यथा या समाज व्यवस्थेमध्ये आपले कुठलेही स्थान राहणार नाही.साहित्य जीवनाला जगण्याचं भान देते असे उद्गार उदयगिरी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ दीपक चिदरवार यांनी काढले.ते शिवाजी महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाने आयोजित केलेल्या वाड्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ ए एम नवले होते. तर व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख डॉ सुरेश शिंदे,डॉ.नरसिंग कदम यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना चिदरवार म्हणाले, साहित्य आपल्याला मूल्य शिकवतं. जीवन कसं जगायचं हे शिकवतं. कुठे कसे काय बोलावे याची जाणीव साहित्य आपल्याला करून देते.जीवन जगत असताना अनेक परिस्थितीने माणसे अस्थिर होत असतात. तेव्हा त्याला साथ देणारा त्याचा खरा मित्र हे पुस्तकच असते. त्यामुळे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये किमान एक तास तरी वाचनासाठी वेळ दिला पाहिजे असेही ते म्हणाले.यावेळी मराठी विभागाच्या संपादक व अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच साहित्यचिंतन या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर वाड्मय मंडळाचे अध्यक्ष कांबळे सुजिता, उपाध्यक्ष देवनाळे कोमल व संपादक मंडळाचे संपादक तोंडारे अश्विनी, उपसंपादक पोतदार नेहा यांचा व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ नवले म्हणाले साहित्य हे माणसाला उभा करते, जीवन घडवते.आत्मचरित्र आपल्याला एक दिशा देऊन जातात. आत्मचरित्रामुळे आपल्या जीवनातील समस्येपेक्षा इतरांच्या जीवनातील समस्या खूप मोठ्या असतात हे दिसून येतं. त्यामुळे माणसांना प्रेरणा मिळते. साहित्यामुळे माणसांना तमोवेदना येते,मम वेदना येते तेव्हा संवेदना तयार होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोतवाल आयेशा, प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.सुरेश शिंदे तर आभार मुंडे अंकिता यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ सी जे देशमुख ,प्रा बालाजी सूर्यवंशी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.