महात्मा फुले महाविद्यालयाच्या ‘असूड’ वार्षिक अंकाला विद्यापीठाचे पारितोषिक
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या ‘असूड- २०२३’ या वार्षिक अंकाला नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने उत्कृष्ट वार्षिकांक म्हणून गौरविले असून, उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले महाविद्यालयाने विद्यापीठ क्षेत्राच्या परिघात गुणवत्तेच्या बळावर स्वतःचे अस्तित्व निर्माण केले असून, गुणवत्तेबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही महाविद्यालयाने नावलौकिक वाढविला आहे. याचाच परिपाक म्हणून, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने महात्मा फुले महाविद्यालयाच्या ‘असूड-२०२३’ वार्षिकांकाला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविले आहे.सन २००९ पासून सातत्याने विविध विषयांवर वार्षिकांक प्रकाशित होत असून, यावर्षी राजर्षी शाहू महाराज विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. या विशेषांकात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावर संशोधनात्मक लेखन केले आहे. या देखण्या व दर्जेदार विशेषांकाची दखल घेऊन विद्यापीठाने उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर केला आहे. विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन तसेच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्रीरंगराव पाटील, सचिव मा. ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, संपादक मंडळ सदस्य , सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.