ध्येय निश्चिती हिच स्पर्धा परीक्षेचे गमक – मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे

ध्येय निश्चिती हिच स्पर्धा परीक्षेचे गमक - मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे

अहमदपूर,( गोविंद काळे) : विविध क्षेत्रांमध्ये स्पर्धा जीव घेणे झाली असून, या स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी ध्येय निश्चिती करून योग्य नियोजन आणि अभ्यासातील सातत्य आवश्यक असून हेच स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक आहे असे, स्पष्ट प्रतिपादन अहमदपूर येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, येथील महात्मा फुले महाविद्यालयात ‘स्पर्धा परीक्षा विभागा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर ; विचारमंचावर मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक तथा स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ बब्रुवान मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना डोईफोडे म्हणाले की, एमपीएससी, यूपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षा पारदर्शक पद्धतीने होतात, यावर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवणे आवश्यक आहे आणि आपले ध्येय निश्चित करून त्या मार्गाने मार्गक्रमण केल्यास कुठल्याही स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळविता येते, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, आमच्या महाविद्यालयात केवळ पाठ्यक्रमाचेच अध्यापन केले जात नाही तर ; आम्ही विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतो. तसेच, स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन देतो याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी याचा लाभ घेतात ते नक्कीच आई-वडिलांचे , गुरुजनांचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करतात. याकरिता आजच्या विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न पहावेत आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नामध्ये सातत्य ठेवावे. तरच, विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर ; सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा विभागाचे सहाय्यक डॉ.प्रशांत बिरादार यांनी व आभार उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, पालक व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author