अभिव्यक्तीच्या प्रकटीकरणासाठी वाचनलेखन चळवळ गरजेची – डॉ. हेमंतजी वैद्य

अभिव्यक्तीच्या प्रकटीकरणासाठी वाचनलेखन चळवळ गरजेची - डॉ. हेमंतजी वैद्य

लातूर (एल.पी.उगीले) : चिमुकल्यांचे भावविश्व खुलवत राहणे, हेच शालेय शिक्षणाचे ध्येय आहे. शालेय विद्यार्थ्यांची कल्पना शक्ती अफाट असते.त्यांच्या कल्पनाशक्तीला व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे.आजची मुले आभासी माध्यमात गुंतत चालली आहेत .या जंजाळातून बाहेर काढण्यासाठीच भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत ‘शिक्षणविवेक’ बालमासिक मुलांच्या हाती दिले जाते, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंतजी वैद्य यांनी केले. येथील केशवराज माध्यमिक विद्यालयात शिक्षणविवेकच्या ‘रानमेवा’ दिवाळी अंक प्रकाशन सोहळा व शिक्षणविवेक प्रतिनिधींच्या चिंतन बैठकीत डॉ.वैद्य बोलत होते.यावेळी मंचावर विद्यासभेचे उपाध्यक्ष तथा शिक्षक प्रतिनिधी उमेश जगताप,संयोजक महेश कस्तूरे,शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादिका डॉ.अर्चनाताई कुडतरकर ,मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी ,प्राथमिक विभागाचे समन्वयक भास्कर कुलकर्णी उपस्थित होते.
प्रारंभी ‘रानमेवा’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.प्रास्ताविकातून भास्कर कुलकर्णी यांनी चिंतन बैठकीचे प्रयोजन हे ‘शिक्षणविवेक’ हा बालकांसाठी अधिक वाचणीय करण्यासाठी असल्याचे नमूद केले. त्यानंतर महेशराव कस्तूरे यांनी आपल्या मनोगतातून या शैक्षणिक वर्षात अधिकाधिक मुले वाचती व लिहती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याची कल्पना मांडली.तसेच हा अंक अधिक आकर्षक बनावा, यासाठी दर्जेदार लेखन करणारे बाललेखक संस्थेतून निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यकारी संपादिका डॉ.अर्चनाताई कुडतरकर यांनी ‘विवेकप्रतिनिधी’ हे प्रकाशक व बाललेखक यांना जोडणारा महत्वाचा दुवा असल्याचे सांगत वाचनलेखन चळवळ अधिक गतिमान करणाऱ्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व उपक्रमाचे कौतुक केले.तसेच पुढील काळात हा अंक अधिक दर्जेदार करण्याचे जाहीर करत आगामी उपक्रमांची माहिती दिली. विद्यासभेचे उपाध्यक्ष उमेश जगताप यांनी शिक्षणविवेक हा केवळ अंक न राहता तो विद्यार्थ्यांचा मित्र बनावा,यासाठी सजावट,बांधणी व दर्जेदार साहित्य लेखन होऊन साहित्य प्रकाशनाची सर्व संस्कार केंद्रांना समान संधी द्यावी , अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी दुसऱ्या सत्रात सर्व विवेक प्रतिनिधींनी आपापले अहवाल मांडले तसेच विधायक सूचना,अपेक्षा व शंका सविस्तरपणे मांडल्या,संपादक मंडळ सदस्य बबनराव गायकवाड यांनी विवेकप्रतिनिधींनी ही वाचन लेखन चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नरत असणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
समारोप प्रसंगी शिक्षणविवेकमध्ये सर्वात जास्त वर्गणीदार,साहित्यलेखन व उपक्रमात सहभागी असणाऱ्या आर्यचानक्य प्रा.विद्यालय,सिद्धेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,केशवराज माध्यमिक विद्यालय,लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय,नाना पालकर प्राथमिक विद्यालय,स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय , खोलेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच लोकमान्य टिळक विद्यालयाचे शिक्षक नितीन चौधरी यांना शुभेच्छा संदेश लेखनाबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या संपूर्ण दिवसभराच्या बैठकीचे सूत्रसंचालन माध्यमिक विभागाच्या समन्वयिका अनिता यलमटे ,वैयक्तिक गीत मुरलीधर गवळी ,कांचन तोडकर व ऋणनिर्देश बबन गायकवाड यांनी केले.

About The Author