आई वडील म्हणजे काय तर…? अडचणीच्या वेळी कामी येणारे फिक्स डिपॉझिट असतात…!!

0
आई वडील म्हणजे काय तर…? अडचणीच्या वेळी कामी येणारे फिक्स डिपॉझिट असतात…!!

आई वडील म्हणजे काय तर…? अडचणीच्या वेळी कामी येणारे फिक्स डिपॉझिट असतात…!!

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात रंगले कविसंमेलन… !

अहमदपूर (गोविंद काळे) : आई – वडील म्हणजे काय असतात…? हे नमूद करून –
‘ त्यांना जपायचं असतं…
आईच प्रेम हे रोजच्या
आयुष्यात कामाला येणारं
बँक बॅलन्स असतं…
*तर वडील म्हणजे
अडचणीच्या *
वेळी कामी पडणारे फिक्स
डिपॉझिट असतात…
म्हणून त्यांना जपायचं असतं.. ‘
या भावस्पर्शी कवितेतून कविसंमेलनाची रंगत अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य, आयक्यूएसी समन्वयक तथा अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. दुर्गादास चौधरी यांनी वाढवली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे व मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘कवी संमेलन व कथाकथन ‘ कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आपली कविता सादर केली.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर विचार मंचावर शीघ्र कवी , उपप्राचार्य तथा आय क्यू ए सी समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी ,कवी डॉ. डी . एन . माने , ज्येष्ठ कवी डॉ. मारोती कसाब , प्रा कल्पना कदम , अजय मुरमुरे, वैष्णवी मुंढे, सत्यशीला स्वामी , वनिता नरवटे , प्रतीक्षा राठोड यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजक प्रो. डॉ. अनिल मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे आपली कविता सादर करताना डॉ. चौधरी म्हणाले की-
‘काही शब्द बडबडले
आणि कवी हे घडले… !
काही शब्द घडले
आणि बिघडले… !!
कवितेचे बी असेच रुजले…!
नव भाव-भावनांनी ,
मोह बंधनांनी,
नवस्पंदनाच्या नवचेतनांनी
कवी घडले…!! ‘
या आशयाची कविता सादर करून उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी कवी डॉ. डी. एन. माने यांनी-
‘पोरी पूर्वी,
डोयीवर पदर
अन्
फाटकाच का असेना
अंगभर
कपडा असायचा…!
अन्
लाजणार्‍या नजरेला
आपुलकीचा मान असायचा…!’
‘पोरी ‘ या कवितेतून भारतीय संस्कृती विसरत चाललेल्या मुलींना जुन्या काळातील मुलींची आठवण करून दिली. तर विद्रोही कवी मारोती कसाब यांनी –
‘शिवराय तुम्ही
पुन्हा जन्मा यावे!
राज्य सावरावे
रयतेचे !!
गुंड पुंड पुन्हा ।
माजले दलाल
झाले मालामाल
रातोरात ।।
माजले मवाली ।
तुम्ही गेल्यावर
झाले शिरजोर
गावगुंड ।।
या ‘शिवराया तुम्ही ‘ तिच्या माध्यमातून सामाजिक विषमता दूर करण्यासाठी व पुन्हा रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुन्हा जन्म घेण्याचे साकडे घातले.
अजय मुरमुरे यांनी ‘झोपडी ‘ या कवितेच्या माध्यमातून गरीबीच जीवनाचे वास्तव चित्रण केलं. या बरोबरच प्रा.कल्पना कदम यांनी ‘माय’ कवितेच्या माध्यमातून आई बद्दलच्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या की-
‘सहज नजर फिरविली
पाहते तर काय ?
साठीच्या संसाराची माय
मनाच्या देव्हाऱ्यात सहजच
शिरली ‘ ही कविता सादर करून गंभीर केले. प्रतीक्षा राठोड या कवयित्रीने ‘सुंदर अश्रु ‘ या कवितेतून आपल्या भावभावना व्यक्त केल्या. वनिता नरवटे या कवयित्रीने ‘होय मी चंद्रभागा बोलतेय !’ या कवितेतून प्रदूषित होत असलेली ‘चंद्रभागा’ आणि नि:ष्प्रभ ठरलेल्या ‘पांडुरंगाचे’ बोलके वर्णन साकरले. वैष्णवी मुंढे यांनी ‘बाया ‘ या कवितेच्या माध्यमातून स्त्री जीवनाचा वास्तव आलेख मांडलं तर सत्यशीला स्वामी यांनी-
‘ आयुष्याचा प्रत्येक क्षण जगा,
आज आहोत पण उद्या नसू,
आपल्याला जे वाटतं…
तेच घडत असतं
असं काही नसतं ,
ॲडजेस्टमेंट हेच
आयुष्य असतं.’
हे ‘अंतिम सत्य ‘ आजच्या जीवनाचा वास्तव मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक ह . भ. प . प्रो. डॉ . अनिल मुंढे यांनी केले तर; सूत्रसंचालन डॉ . बब्रुवान मोरे यांनी व आभार डॉ. मारोती कसाब यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *