पाण्यासाठी शेकडो कोटी निधी आला ! तरीही मतदारसंघ तहानलेला ?

0
पाण्यासाठी शेकडो कोटी निधी आला ! तरीही मतदारसंघ तहानलेला ?

पाण्यासाठी शेकडो कोटी निधी आला ! तरीही मतदारसंघ तहानलेला ?

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचा मतदारसंघ. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, नाल्या, इमारती, समाज मंदिरे आणि इतर मंदिरे यासोबतच पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून शेकडो कोटी रुपयांचा निधी आल्याचे सांगण्यात आले. मतदार संघात जल जीवन योजना आणि वॉटर ग्रिड च्या माध्यमातून शेकडो कोटी निधीचा हिशोब सांगण्यात आला. मात्र सद्यस्थितीत उदगीर तालुक्यातील 108 जलजीवन योजना पैकी फक्त 20 योजना पूर्ण झाल्या आहेत. आणि जवळपास 56 योजना शासकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार प्रगतीवर आहेत, तर 18 योजना संथ गतीने प्रगती करत आहेत. काही योजना बद्दल वाद निर्माण झाला आहे, अर्थात तो ग्रामपंचायत पातळीवर, काही गुत्तेदारांच्या पातळीवर त्यामुळे त्या बंदच आहेत. अशीच अवस्था जळकोट तालुक्यातीलही आहे. जळकोट तालुक्यामध्ये 48 पैकी 36 नळ योजना बंद आहेत. तर काही नळ योजनांचे स्त्रोत कोरडे पडले आहेत.
जर या जलजीवन योजनेचे स्त्रोत कोरडे पडले तर वॉटर ग्रीड योजनेतून पाणी मिळेल, असे सांगण्यात आले होते. मात्र त्या सगळ्या सद्यस्थितीत तरी कागदावरच्या गप्पा ठरल्या आहेत. मतदार संघातील तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांना उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत टंचाई निवारण यंत्रणा राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्याप्रमाणे सद्यस्थितीत शासकीय पातळीवरून 28 गावात टँकर लावण्याची मागणी होत असल्याचे समजते. या ठिकाणी देखील पुन्हा गाव पातळीवर पुढारी आणि टँकर लॉबी आपलेच खरे हे सांगत, आपले टँकर लागावे. यासाठी धडपडत आहेत.

पाण्यासाठी शेकडो कोटी निधी आला ! तरीही मतदारसंघ तहानलेला ?

खैर, तो टँकर लॉबीचा प्रश्न बाजूला ठेवून नळ योजनांची परिस्थिती पाहिल्यास कित्येक नळ योजना कागदोपत्री पूर्ण झाल्याचे जरी सांगत असले तरी, या नळ योजनेसाठी खोदलेले रस्ते अद्यापही खड्डेमयच आहेत. या योजनेमध्ये त्या रस्त्याची दुरुस्ती देखील समाविष्ट असताना काम पूर्ण झाले म्हणून गुत्तेदार निवांत झाल्याची चर्चा गावागावात आहे. मात्र या योजनेंपैकी बहुतांश योजना या गाव पुढारी किंवा नेतेमंडळीच्या बगलबच्चांनी सुरू केलेल्या असल्यामुळे त्यांना बोलावे तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत लातूर जिल्हाधिकारी पातळीवरील तपासणी यंत्रणांनी वेळोवेळी या संथ गतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत. मात्र निर्ढावलेले आणि राजकीय वरदहस्त असलेले गुत्तेदार बिनधास्त आहेत. सर्वसामान्य माणूस पाण्यासाठी वन वन भटकतो आहे. गोरगरीब महिला रोजगार सोडून पाण्यासाठी भटकू लागल्या आहेत. इतके भीषण चित्र असताना देखील हे कंत्राटदार अत्यावश्यक कामाकडे म्हणाव्या त्या गांभीर्याने का पाहत नसतील? हे कळायला मार्ग नाही.
निसर्ग कोपल्यामुळे आणि उदगीर विधानसभा मतदारसंघातील अनेक पाझर तलाव, साठवण तलाव यांनी तळ गाठला असल्यामुळे, अनेक निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. या अनुषंगाने देखील मतदार संघात टोकाची टीका चालू आहे. “दैव देत आणि कर्म नेते” अशी अवस्था उदगीर विधानसभा मतदारसंघाची झाली आहे. शासकीय पातळीवरील मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याची नोंद झाली असल्याने, पुन्हा अशा योजना उदगीर विधानसभा मतदारसंघात चालू होणार नाहीत, मात्र ज्या झाल्या आहेत, त्याही कामाच्या नाहीत की काय? अशी परिस्थिती सद्यस्थितीला दिसू लागली आहे.
हा मतदारसंघ मंत्री महोदयांचा असल्यामुळे अधिकारी देखील कठोरपणाची भूमिका घेत नसल्याची चर्चा आहे. शिवाय कित्येकांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वाट पाहणे चालू आहे. आपल्या पक्षाला मतदान नाही दिल्यास, गाव पातळीवरील शासकीय कामाची बिले निघणार नाहीत, अशी धमकी नेत्यांनी दिल्याची चर्चा ग्रामीण भागात रंगू लागल्या आहेत. त्यामुळे हे अनेक कंत्राटदार घाबरले आहेत. अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. कोणीही येऊ, यांना त्याचे फारसे काही देणे-घेणे नाही. मात्र त्यांची बिले निघणे गरजेचे आहे. अशीही चर्चा चालू आहे. शासकीय पातळीवरून नोटीस देऊन देखील ही कामे रखडलेलीच कशी ? अशी चर्चा नागरिक करत असले तरी विचारावे कोणाला? असा प्रश्न पडलेला असल्यामुळे नागरिक गप्प आहेत. मात्र तीव्र पाणीटंचाईच्या परिस्थितीमुळे जनतेसोबतच उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये पशुधनाच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे आता पेरणीसाठी लगबग करावे म्हणून शेतकरी धडपडत असतानाच, पाणीटंचाईने कोंडीत पकडले आहे. शासकीय पातळीवरून लवकरात लवकर उपाय योजना व्हाव्यात. अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ज्या योजना रद्द झाल्या आहेत, ज्या योजना अत्यंत संथ गतीने चालू आहेत. त्यांना तातडीने चालना देणे गरजेचे आहे. या योजनेच्या कामासाठी दीड वर्ष उलटून गेला तरी अद्याप मुहूर्त सापडत नसल्याने ग्रामीण भागातील जनता वैतागलेली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *