शाळेची तयारी : अवघा १५ दिवसांच्या व्यवसायामुळे रिटेल थंड; मध्यमवर्गीय ग्राहकांवर भिस्त
अहमदपूर( गोविंद काळे ) : आयसीएससी आणि सीबीएससी शिक्षणक्रमांच्या इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये शाळेतूनच विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य, गणवेश घेणे सक्तीचे केल्यामुळे गेल्या काही वर्षांत शालेय साहित्य रिटेल व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, त्यांचे गणित बिघडले आहे. पूर्वी शाळा सुरू झाल्यानंतर पुढील दोन- अडीच महिने जोमात राहणारा हा व्यवसाय आता अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपल्याची माहिती शहरातील रिटेल व्यावसायिकांनी दिली.
एसएससी बोर्डाच्या शिक्षणक्रमांच्या शाळांना १५ जूनपासून प्रारंभ होत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी पालक- विद्यार्थ्यांची वह्या- पुस्तकांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होते. नववी आणि दहावीसह अकरावी, बारावी या महाविद्यालयीन शिक्षणासाठी साहित्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढते. त्यामुळे व्यावसायिकांसाठी हा हंगाम सुगीचा असतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतूनच साहित्य खरेदीची सक्ती केल्यामुळे वह्या- पुस्तके स्टेशनरी व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे थोडगा रोड, मेन रोड , आझाद चौक येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
रजिस्टर, वह्यांच्या किमतीत १० टक्के वाढ
यंदा बॅण्डेड कंपन्यांच्या रजिस्टर, वह्यांच्या किमतीत सुमारे १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, स्थानिक कंपन्यांच्या वह्यांच्या किमती स्थिर असल्याची माहिती रविवार पेठेतील आनंद पुस्तकालयाचे संचालक वेदांत हिले यांनी दिली. साधारणतः पहिली ते आठवी पर्यंत ए-५ आकारातील वही विद्यार्थी अभ्यासासाठी वापरतात. त्यामध्ये लोकल कंपन्यांच्या वह्याच्या किमती स्थिर आहेत. नववी आणि त्यापुढील इयत्तांसाठी विद्यार्थी रजिस्टर वापरण्यास पसंती देतात. कंपास, पेन्सिल सेट आदी साहित्यांच्या किमतीत फारशी वाढ झाली नसल्याची माहिती रिटेल व्यापाऱ्यांनी दिली.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शालेय साहित्य घेण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या रिटेल व्यवसायावर ४० ते ५० टक्के परिणाम झाला आहे. पूर्वी शाळा उघडल्यापासून दोन-अडीच महिने दुकानात ग्राहकांची गर्दी होत असे. आता शाळा सुरू झाल्यानंतर १५ दिवसांपर्यंतच व्यवसाय चांगला होतो. इंग्रजी शाळांच्या सक्तीने रिटेल व्यवसायाचे मोठे नुकसान तर झालेच आहे पण संबंधीत शाळांनी शाळेमध्येच चढ्या भावाने स्टेशनरी साहीत्यांची विक्रि करून एक प्रकारे व्यवसायच मांडला आहे. आता केवळ मराठी माध्यमात शिकणाऱ्या ग्राहकांवरच व्यवसायाची भिस्त आहे.