आजार कोणताही असो अंगावर काढू नका – डॉ. शरद कुमार तेलगाणे
उदगीर (एल. पी. उगिले) : सध्या वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला, ताप अशा पद्धतीचे आजार जाणवायला लागतात. पावसाळ्यात ठिक ठिकाणी डबक्यात पाणी साचल्याने साथीचे आजार सुरु होतात. काही ठिकाणी डास उत्पत्ती होऊन इतरही आजार होऊ शकतात. केवळ ताप आहे, फक्त सर्दी आहे, अंगदुखी आहे. म्हणून स्वतःच्या मर्जीप्रमाणे घरात असलेली औषधे किंवा औषध विक्रेत्याकडून औषध घेऊन वेळ निभावून नेऊ नका. असा सल्ला ओम हॉस्पिटलचे तज्ञ डॉ. शरदकुमार तेलगाणे यांनी दिला आहे. सध्याची परिस्थिती वेगळी आहे. वेगवेगळ्या गंभीर स्वरूपातील आजार होऊ लागलेली आहेत. अशा परिस्थितीत वेळीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार घ्यावेत, अन्यथा उशीर झाल्यास निदान हायला वेळ लागल्यामुळे जास्त त्रास सहन करावा लागतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डबक्यात साचलेल्या पाण्यात डास होऊन डेंग्यूसदृश आजाराची ही काही ठिकाणी लक्षणे आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच भांड्यात, घराच्या आजूबाजूला, छतावर, वेगवेगळ्या टाकाऊ वस्तु मध्येही पाणी साचून त्यामध्येही डासांची उत्पत्ती होत असते. आणि त्यापासून साथीचे रोग समाजामध्ये पसरू शकतात. सध्या ग्रामीण भागात काही ठिकाणी डेंगू सदृश्य आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसत असून नाल्या, गटार तुंबलेले आहेत, नाल्या गटारातील घाण रस्त्यावरच टाकली आहे. अशा ठिकाणी दुर्गंधी सोबतच डास निर्माण होऊन मलेरिया सारखे रोग वाढू लागले आहेत. त्यासाठी एका बाजूला नागरिकांनी स्वच्छता पाळावी, त्यासोबतच आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा ही योग्य वापर करावा. कोरोना विषाणूचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला असला तरी पूर्णपणे थांबलेला नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, महसूल प्रशासन आणि स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना त्याचेही पालन करावे. असेही आवाहन याप्रसंगी डॉक्टर शरदकुमार तेलगाणे यांनी केले आहे. शहरातील अनेक गल्लीबोळातून नाल्या तुंबलेल्या आहेत. पाणी साचल्यामुळे डास, मच्छर, किडे यांचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने धूर फवारणी सह गटारी स्वच्छ कराव्यात. अबॅटिंग करावी, त्यासोबतच डेंगू हा जीवघेणा आजार असल्याने त्याचा प्रसार होणार नाही. यासाठी दक्षता घ्यावी. असेही आवाहन डॉक्टर तेलगाणे यांनी केले आहे. या साथीच्या रोगा मध्ये लहान बालके आणि वृद्धांना जास्त जपावे. त्यांची प्रतिकारक्षमता वाढेल अशा पद्धतीचा आहार त्यांना द्यावा. भारतीय संस्कृती प्रमाणे राहण्याचा प्रयत्न करावा. असाही सल्ला दिला आहे. प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक आणि सामाजिक जाणीव ठेवून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. आपला परिसर स्वच्छ ठेवावा. आपल्या आजूबाजूला लोकांमध्ये जनजागृती करावी. वेळोवेळी आपल्या परिसरातील स्वच्छतेच्या संदर्भात पालिका प्रशासन आणि आरोग्य केंद्राशी संपर्क साधून उपाययोजनांच्या संदर्भात सूचना कराव्यात. अशा काही महत्त्वाच्या बाबी याप्रसंगी डॉक्टर शरद तेलगाने यांनी सांगितल्या आहेत.