डॉक्टर चंबुले यांच्यावर गुन्हा दाखल होणे म्हणजे सामाजिक दुर्दैव – प्रा गोपाळकृष्ण घोडके
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील सामाजिक जाण ठेवणारे आणि तब्बल 21 वर्षांपासून गोरगरिबांची सेवा करून वैद्यक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे डॉ माधवराव चंबुले यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अडचणीत आणण्याचा जो प्रयत्न केला गेलेला आहे, तो अत्यंत निंदनीय आहे. गेल्या 21 वर्षात हजारो रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करून डाॅ.चंबुले यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. “गरीबों का मसीहा” अशा पद्धतीची त्यांची ओळख समाजात असतानाच त्यांची लोकप्रियता आणि सामाजिक सन्मान संपवण्यासाठी कोणीतरी षडयंत्र रचून त्यांना बदनाम करण्याचा डाव घातला आहे. अशी प्रतिक्रिया उदयगिरि अकॅडमीचे संचालक तथा पी टी ए चे राज्य उपाध्यक्ष प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. माधवराव चंबुले यांनी आर्थिक फायदा विचारात न घेता उदगीर सारख्या शहरात पहिले मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभा केले. या भागातील आरोग्यसेवा सुधारली पाहिजे, त्याच बरोबर गंभीर स्वरूपातील आजारासाठी या भागातील रूग्णांना मोठ्या शहरात जाणे लागू नये. त्यांचा खर्च वाचावा. या उदात्त हेतूने त्यांनी उदगीर मध्ये आपले समविचारी मित्र एकत्र घेऊन मोठा प्रकल्प उभा केला. कर्मधर्मसंयोगाने त्यांच्या प्रयत्नाला यश आले. मात्र नाव लौकिक होऊ लागला की अनेक हितशत्रू ही निर्माण होतात! तसेच डॉ. माधव चंबुले यांच्याही बाबतीत घडले आहे. वास्तविक पाहता शहरातील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या विरोधात कोणी तक्रार दिली तर पहिल्यांदा या तक्रारीची शहानिशा करून गुन्हा दाखल केला जायला हवा, मात्र गुन्हा दाखल करून चौकशी सुरू झाल्यास त्या व्यक्तीची होणारी सामाजिक प्रतिष्ठेची हानी आणि मानसिक ताण या गोष्टी न भरून येणार्या असतात. त्यामुळे पूर्ण चौकशीअंती गुन्हा दाखल झाला असता तर बरे झाले असते. असे विचार प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी व्यक्त केले.
उदगीर शहरातच नव्हे तर पंचक्रोशीत आणि सीमावर्ती भागात देखील डाॅ. माधव चौगुले हे एक चारित्र्यसंपन्न आणि सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. समाजामध्ये त्यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे. त्यांच्या लोकप्रियतेला धक्का देण्याच्या उद्देशाने हा डाव रचला गेला असावा. अशीही शंका प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने सखोल शहानिशा करून ज्यांनी कुणी षडयंत्र रचले आहे? ते शोधून काढावे. अशीही अपेक्षा गोपाळकृष्ण घोडके यांनी व्यक्त केली आहे.