ज्ञानयज्ञ हा सर्वश्रेष्ठ यज्ञ – ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर

उदगीर (एल.पी.उगीले)
यज्ञ म्हणजे केवळ पूजा नसून यज्ञाचे विविध प्रकार आहेत, ज्ञानयज्ञ हा सर्वश्रेष्ठ यज्ञ असून ज्ञान होणे हेच खरे जगणे असल्याचे मत ह .भ .प .चैतन्य महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले. उदगीर येथील श्री सद्गुरु सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत बुधवारी बोलताना त्यांनी यज्ञा बाबतचे गैरसमज दूर करत यज्ञ म्हणजे काय याबाबत सविस्तर विवेचन केले.
केवळ होम हवन व यज्ञकुंड म्हणजे यज्ञ नव्हे तर यज्ञाचे अनेक प्रकार आहेत. शेती करणे हा सुद्धा एक यज्ञ आहे पृथ्वी नावाच्या कुंडामध्ये पाण्याचे हवन करून पीकरूपी फळ काढणारा शेतकरी हा सर्वश्रेष्ठ असतो. याचबरोबर नित्यकर्म हा सुद्धा यज्ञच असतो. या यज्ञामध्ये अनेकांचे योगदान असते, ज्याचे त्याला देऊन टाकणे म्हणजे यज्ञ होय अशा शब्दात महाराजांनी यज्ञाची सोपी व्याख्या करून सांगितली. माझे असे जो म्हणतो तो यज्ञ करू शकत नाही मात्र माझे काहीच नाही असे म्हणणारा यज्ञ करू शकतो, असे सांगून यज्ञा मागची भूमिका त्यांनी सविस्तरपणे समजावून सांगितली. शरीर मन क्रिया भगवंता साठी खर्च करणे म्हणजेच यज्ञ करणे होय. असे सांगताना ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी त्याच्या व्यवहारातील उदाहरणे देत यज्ञा संबंधीचे गैरसमज दूर केले.
कर्माचा परिणाम मनुष्याला भोगावा लागतो, ज्ञान हे परंपरेनेच येते. अनुभवातून तुम्ही शहाणपण देऊ शकता, मात्र ब्रह्मज्ञान हे गुरुपरंपरेतून येते, कर्म त्याग म्हणजे ना पापाची ना पुण्याची निर्मिती असे सांगून कर्म बंधनात आहे, त्याचा जन्म होतो तर कर्म बंधनात नाही तो अवतार असतो. अवतारी श्रद्धेने पाहिली जाणारी संकल्पना आहे. त्यामुळे श्रद्धाही अत्यंत महत्त्वाची आहे. असे देगलूरकर महाराज पुढे बोलताना म्हणाले. अवताराचा संदर्भ धर्माशी असून धर्म संस्थापना हा अवताराचा हेतू असतो, भक्ताचे रक्षण व दुर्जनाचे निर्दालन हा अवताराचा हेतू असतो असे महाराज पुढे बोलताना म्हणाले. राम आणि कृष्ण या अवतारांचे किंवा अन्य अवतारांचे तत्व एकच असून तत्त्वाला जाणणारा तत्वरूप होतो. तत्त्व एक असते व स्थिर असते. असे विवेचन महाराजांनी पुढे बोलताना केले.
सद्गुरु सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मागच्या पाच वर्षापासून ही प्रवचन माला उदगीर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या मैदानावर होत असून या प्रवचन मालेचा समारोप होत आहे.