वन्यप्राण्यांचा अभ्यास पशुवैद्यकांना अधिक जबाबदार बनवतो: डॉ एन झेड गायकवाड

उदगीर(एल.पी.उगीले)
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे सेंटर फॉर वाइल्डलाइफ स्टडीज, बेंगळुरू आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने “वाइल्ड सुरक्षे : पब्लिक हेल्थ अँड सेफ्टी प्रोग्राम” ह्या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल विभागांतर्गत करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्री. नंदकुमार गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वन्यजीवांचे संरक्षण करण्यात एक पशुवैद्यक म्हणून आपले कर्तव्य आणि जबाबदारी काय आहे, ह्यावर विद्यार्थ्यांना उद्बोधित केले. सदर कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे गणेश होनवाड, सिनिअर प्रोग्राम मॅनेजर यांनी वन्यप्राणी आणि मनुष्य ह्यांच्यात होणारे संघर्ष कसे कमी करता येतील, दोघांचे सहअस्तित्व कसे सुदृढ करता येईल, तसेच वन्यजीवांचा अवैध व्यापार आणि त्याबद्दल अस्तित्वात असलेले कायदे याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती. नेहा भंडारे, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर, महाराष्ट्र यांनी वन्यप्राणी आणि मनुष्य ह्या दोघांमध्ये एकमेकांना बाधित करणाऱ्या आजारांबाबत तसेच असे आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी, आणि बाधित झाल्यास काय उपाययोजना करावी. यासंबंधी विद्यार्थ्यांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले. वन्य प्राणी आणि मनुष्य यांच्या संघर्षात जखमी झालेल्या मनुष्यांवर तातडीने प्रभावी प्रथमोपचार कसे करावे? ह्यांची प्रात्यक्षिके प्रमुख पाहुण्यांनी कृतीतून सादर केली. त्यामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना पदवी मिळाल्यानंतर वन्यजीव क्षेत्रामध्ये अभ्यास, संशोधन, सेवा आणि रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि त्याचा लाभ विद्यार्थी कशाप्रकारे घेऊ शकतात? हे अवगत करण्यासाठी ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ प्रकाश घुले यांनी प्रास्ताविकात आणि सूत्रसंचालनात अधोरेखित केले. डॉ शरद आव्हाड यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात डॉ. रवींद्र जाधव, डॉ. संदीप ढेंगे, डॉ. विवेक खंडाईत आणि डॉ. वेदांत पांडे यांनी बहुमोल योगदान दिले.
महाविद्यालयात क्रमिक पाठ्यपुस्तक व्यतिरिक्त परंतु अभ्यासक्रमाशी निगडित वन्यजीव सुरक्षा आणि लोक स्वास्थ्य अशा विषयावर ही नावीन्यपूर्ण मोफत कार्यशाळा आयोजित केल्याने विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालय आणि सेंटर फॉर वाइल्डलाइफ स्टडीज, बेंगळुरू यांच्या संयुक्त प्रयत्नांबद्दल आनंद व्यक्त केला, आणि आपले हर्षित अभिप्राय नोंदवले.