पितृनिष्ठ व गुरुनिष्ठ संत: वै.सखाराम महाराज दस्तापुरकर
वै.ह.भ.प.संत सखाराम महाराज दस्तापुरकर यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम. श्री क्षेत्र महादेव संस्थान (पदमावती) दस्तापुर ता.पुर्णा जि.परभणी येथे संपन्न होत आहे.त्या निमीत्त त्यांच्या संबंधाने वाहीलेली ही शब्दांजली.
मानवी जीवनात संस्कारांना अतीव महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीने कित्येक हजार वर्षांपूर्वी आपल्याकडे पाच देव सांगितले. त्यात मातृ देवो भव, पितृ देवोभव, आचार्य देवोभव, देवो देवोभव, अतिथी देवोभव हे ते होत. प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे की त्यांनी या पाच देवांना आयुष्यात महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे. अनेक माणसे जीवनात या पाच देवांना विसरून वेगळेच मार्ग अवलंबताना दिसतात. त्याला आपल्या शास्त्रात निषिद्ध मानले आहे. मुळात सामान्य माणसाचे देवात व संतात रूपांतर करण्याची ताकत ही या पाच देवाच्या सेवेत दिसून येते. तसेच या पाच देवांची मनोभावे सेवा करणारे आधुनिक काळातील संत वै.सखाराम महाराज दस्तापुरकर होत. विशेषतः त्यांनी आपल्या माता पित्याच्या व गुरूच्या प्रती आयुष्यभर निष्ठा बाळगून सेवा केली.
आपल्या विविध शास्त्रांनी, इतिहासाने, साहित्यकारांनी मानवी जीवनात निष्ठेला अनन्य साधारण महत्त्व दिले आहे. ही निष्ठा मानवाकडे असली पाहिजे. खरे तर आपल्या रामायण ग्रंथात गंधमादन या वानराच्या माध्यमातून निष्ठेबद्दलचे वर्णन आलेले आहे तर महाभारतात भिष्माचार्यांची किंवा कर्णाची असलेली निष्ठा ही दिसून येते.इतिहासात छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची असलेली निष्ठा आपण सगळेच जाणतो. ही निष्ठा मानवातच दिसून येते असे नाही तर पशु प्राण्यांच्या मध्ये देखील दिसते. ज्यात महाराणा प्रताप व त्यांचा चेतक नावाचा घोडा,छत्रपती शिवराय व त्यांचा कुत्रा अशा कितीतरी उदाहरणातून आपणास पहावयास मिळते. मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने देवत्व आणि संतत्व प्राप्त करून देण्याचे काम ही या पाच देवाप्रती असलेल्या निष्ठेतूनच घडते. माणूस म्हटल्यानंतर आपल्याकडे निष्ठा तर जरूर असावी पण ती कोणा प्रती आहे हे देखील महत्त्वाचे आहे.वै. सखाराम महाराजांचा जीवनपट पाहिला तर आयुष्यभर त्यांची निष्ठा ही या पाच देवांप्रती आणि विशेषता पिता व गुरुप्रती जास्तीची असल्याचे दिसते.वै. सखाराम महाराज थोर संत गुरुवर्य वै.मारोतराव महाराज यांच्या पोटी जन्माला येऊन त्यांनी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे चालवत परमार्थ वाढविण्याचाच प्रयत्न केला.वै.सखाराम महाराज अडीच वर्षाचे असताना वै.मारोतराव महाराजांनी संसाराचा त्याग करून परमार्थ मार्ग स्वीकारला व पूर्णवेळ ‘दिन रजनी हाची धंदा lगोविंदाचे पोवाडे llयाप्रमाणे आपले गुरु वै.मोतीराम महाराज यांच्या सेवेत कार्यरत राहिले. असे असतानाही सखाराम महाराजांनी आपल्या वडिलांबद्दल कधीही राग व्यक्त केला नाही की विरोध केला नाही.परमार्थात अडचण आणली नाही उलट घराकडील सर्व भार पेलला.तो ही परमार्थ करत करत. आपले बंधू पांडुरंग महाराजांबरोबर दैनंदिन कर्मे सांभाळत. वै. मारोतराव महाराज तेंव्हापासून जवळपास ३५ वर्षे घर सोडूनच राहिले फक्त आपल्या मूळगावी दस्तापुर येथे श्री क्षेत्र महादेव संस्थान (पद्मावती) कार्यक्रमांच्या निमित्ताने येत असत.याकामी सखाराम महाराजांच्या मातोश्री कृष्णाबाई यांचे ही त्यात अवर्णनीय असे योगदान आहे.खरे तर पितृभक्तीचे व गुरुभक्तीचे महत्व आपल्या शास्त्रांमध्ये परोपरीने आले आहे. म्हणतात ना ‘गुरु कृपा झाली lइमारत फळा आली ll’या संत उक्तीप्रमाणे शाळेचे कधी तोंड न बघितलेल्या सखाराम महाराज यांना गूरुकृपेमुळे परमार्थाचे ज्ञान झाले.जीवनभर परमार्थ अत्यंत निष्ठेने केला. महाराजांचा स्वभाव अत्यंत भोळा होता. आपण ज्याप्रमाणे प्रभू शंकरांना ‘शिवभोळा चक्रवर्ती ‘ म्हणतो तसेच भोळेपण महाराजांकडे होते.आपले वडील एवढे मोठे संत आहेत, आपले दोन्ही सुपुत्र ह.भ.प. त्र्यंबक महाराज व ह.भ.प. अच्युत महाराज महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आहेत.ते मोठ्या गादीवरती विराजमान आहेत याचा अहंकार त्यांच्या मनाला कधीच शिवला नाही. हे मात्र खरे की त्यांना आपल्या वडिलांचे व मुलांचे परमार्थ क्षेत्रातील काम पाहून आनंद वाटायचा. ‘पुत्राचे विजये l पिता सुखावत जाय ll’ असे ते नेहमीच अनुभव घेत असत. त्यांनी नश्वर संसारात भौतिक सुविधा वाढविण्यासाठी कधी पित्याकडे व मुलांकडे अर्थाची मागणी केली नाही. विशेष म्हणजे ते आणि त्यांच्या पत्नी नर्मदाबाई या नेमाणे आषाढी कार्तिकी वारी करत असत.महाराजांनी तर शेवटच्या श्वासापर्यंत ही वारी केली.’नेमा न टळे निर्धारी ‘ असे जीवन ते जगले.असाच आणखीन एक नेम त्यांचा होता तो म्हणजे परभणी येथे लोकमान्यनगरात आपल्या मुलांकडे राहताना सकाळी पाच मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याशिवाय ते पाणी सुद्धा पीत नसत. त्यांना पंचक्रोशीत दादा या नावाने संबोधले जात असे. महाराजांना रूक्मीण नावाची सुकन्या आहे.त्यांचा विवाह ईसाद ता.गंगाखेड येथील पारमार्थिक घराण्यात करुन दिला आहे. त्या आपल्या आजोबांचा व पित्याचा वारसा पुढे चालवताना दिसतात.माणिक महाराज हे त्यांचे थोरले चिरंजीव.ज्यांनी शेतीलाच ईश्वर मानुन सावता माळी यांच्या प्रमाणे अत्यंत प्रामाणिकपणे परमार्थ करताना दिसतात. वै.सखाराम महाराज हे आयुष्यभर जिथे जिथे भागवतकथा, रामकथा, ज्ञानेश्वरी पारायण,कीर्तन असतील तेथे आवर्जून उपस्थित राहत असत.त्यांनी आयुष्यभर श्रवणभक्तीला विशेष महत्त्व दिले. एकादा भक्त त्यांना भेटायला आला तर त्याला ते पाया न पडू देता गाडगे महाराजांप्रमाणे त्याच्या पाठीवर आधाराचा व प्रेमाचा हात मारत व म्हणत ‘आला माझा वाघ’. त्यांनी आयुष्यात कधी ही कुणाचा द्वेष केला नाही की निंदा केली नाही. पित्याप्रमाणे त्यांनी मातेवर ही जीवापाड प्रेम केले. प्रभू रामचंद्र म्हणाल्या प्रमाणे जननी आणि जन्मभूमीवर ते जिवापाड प्रेम करत असत.दस्तापूर येथे विशेषता पद्मावती देवस्थानात ते श्रावण महिन्यात महिनाभर तेथेच राहात असत. वैशाखातील सप्ताहात ही ते उपस्थित राहत व धार्मिक कार्यात वीणा घेण्यापासून कुठलेही काम करताना त्यांना कधीही मनाच्या ठिकाणी कमीपणा जाणवला नाही. ते आपल्या पुत्रांकडे परभणी येथे राहात असत. असेच परभणी येथे लोकमान्य नगरात दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर आहे.त्या मंदिरात कृष्णअष्टमी व गुरुवर्य मोतीराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण सुरु होते.त्या दिवशी ते पारायणासाठी गेले.तेथे पारायण करणाऱ्यांना म्हणाले की मला तुम्हा सगळ्यांना आज बुका लावायचा आहे. ते ऐकून वाचक वामनराव झाडे म्हणाले की दादा उल्टे होते आहे. महाराज म्हणाले नाही बरोबर आहे. त्यांनी उपस्थित सगळ्यांना बुक्का लावला. ज्ञानेश्वरी ग्रंथ मागितला. कोणीतरी म्हणाले दादा, तुम्हाला वाचता येत नाही तर ज्ञानेश्वरी कशासाठी? ते म्हणाले वाचता येत नसेल तर काय झाले पहाता येत नाही का? ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचे वाचन चालू होते. त्यावेळी त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर डोके ठेवून तेथेच प्राण समर्पित केला व गुरुवर्य मोतीराम महाराज यांच्या पुण्यतिथीचा मुहुर्त साधला व तसेच ज्यांनी भगवतगीता सांगितली व ज्या गीतेतुनच ज्ञानेश्वरीचा जन्म झाला त्या भगवान श्रीकृष्णाच्या अष्टमीच्या दिवशी प्राण कृष्णअर्पण केला व शेवटचा दिस गोड व्हावा हे करून संतत्व सिद्ध केले.
दस्तापूर येथील पद्मावती या देवस्थानासी माझा तसा वयाच्या दहाव्या वर्षापासून सहवास आला. कारण वै. मारोतराव महाराज हे आमच्या गावात अक्षय तृतीयेच्या काळात वार्षिक सप्ताहात सुरुवातीला सात दिवस व नंतर पाच दिवस सलग राहत असत. त्यांचे मंदिरातच राहणे, मंदिराचं जेवण व सर्व धार्मिक विधी प्रवचन व कीर्तन पार पडत असत. आमच्या सप्ताहानंतर काही दिवसांनी दस्तापुर येथील पद्मावती देवस्थानचा अखंड हरिनाम सप्ताह असायचा. त्या वेळी आमच्या मौजे देवकरा ता. अहमदपूर या गावचा एक दिवसाचा जागर या सप्ताहात असायचा. मी लहानपणापासून पारमार्थिक असल्यामुळे अभंग,गौळणी म्हणायचा. वडीलांबरोबर व गावक-यांबरोबर या सप्ताहाला जायचा. तोही पायीच. रस्त्यात एखादा मुक्कामही होत असे.माझ्या वडीलांना ही गूरूच्या आशिर्वादाने संतांचे मरण आले. त्या बालमनावर या सप्ताहाचे व गुरुवर्य संत मारोतराव महाराजांचे व वै. सखाराम महाराज यांच्या सहवासाचे सुयोग्य परिणाम झाले. आमच्यात माणूसपण निर्माण झाले. यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे मला नेहमी वाटते ‘काय सांगू मी या संतांचे उपकार lमज निरंतर जागविती ll’ आज जे काही आम्ही काम करतो आहोत. ते ‘मार्ग दाऊनी गेले आधी lदयानीधी संत ते ll’परवाचीच घटना आहे मी गुरुवर्य मोतीराम महाराजांच्या सप्ताहासाठी प्रवचन सेवा करण्यासाठी गावाकडे नीघालो होतो.अर्ध्या वाटेत असतानाच विद्यापीठातून फोन आला की तूम्हाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यातून ग्रामीण भागातील उत्कृष्ट प्राध्यापक हा पुरस्कार मिळाला आहे. ही किमया माझ्या गुरुच्या आशिर्वादाची आहे असे मी मानतो.कारण चांगले काम करण्याची बुध्दी नेहमी त्यांनीच मलि दिली आहे.
खरे तर आज महाराष्ट्राला ‘नाचू कीर्तनाचे रंगी l ज्ञानदीप लावू जगी ll’ या संतोक्तीप्रमाणे बालवयापासून परमार्थ सेवेतरत ह.भ.प. अच्यूत महाराज, ह.भ.प. त्र्यंबक महाराज हे आपल्या आजोबा प्रमाणे व वडिलांप्रमाणे ‘माझ्या वडिलांची मिराशी गा देवा l तुझी चरण सेवा पांडुरंगा ll’ असे कार्य करत आहेत. आपल्या वडिलांच्या प्राण समर्पणा नंतर त्यांनी सतत पंधरा दिवसापासून गरुडपुराण वाचन, नामसंकिर्तन व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. दि.०९ सप्टेंबर २०२१ रोजी रात्रभर विविध किर्तनकार आपली सेवा अर्पीत करणार आहेत. शेवट आज दि.१० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दु. १.०० या वेळात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, वारकरी भूषण,वाणी प्रभू, चारित्र्याचे महामेरू परम आदरणीय रामायणाचार्य ह.भ.प.रामरावजी महाराज ढोक यांच्या कीर्तनाने होत आहे. त्या नंतर महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले आहे. यावरूनच लक्षात येते की या माझ्या गुरुघरावर किती लोकांचे निस्वार्थ प्रेम आहे.
आज वै.सखाराम महाराज आपल्यात नसले तरी ते विचारांनी व कृतीने आपल्यातच आहेत. त्यांचे आचार व विचार आपण आपल्या आयुष्यात उतरवीणे हीच त्यांच्याप्रती खरी आदरांजली ठरणार आहे. माझ्या गुरू घराला व सर्व शिष्य मंडळींना त्यांचा सतत आशीर्वाद मिळत राहावा. या सदिच्छेसह मी ही शब्दांजली अर्पित करून थांबतो.
आपलाच संतचरणरज
प्रा. डॉ.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर
ता.मुखेड जि.नांदेड.
भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५