प्रशासन व लोक प्रतिनिधी यांच्या समन्वयातून टळला पुराचा धोका
नाशिक/निफाड (आकाश शेटे) : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात पावसाची दमदार सुरुवात झाली.यात दारणा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यासह इतर ही ठिकाणाहून गोदावरी नदी मध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला. इगतपुरी, त्रंबकेश्वर सह नाशिक धरण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे चांदोरी सह सायखेडा करंजगाव,शिंगवे यासह गोदाकाठ परिसर नेहमी पुराच्या संकटाचा सामना करत आलेला आहे. पावसाळा व महापूर हे नेहमीचंच समीकरण असल्यामुळे प्रशासनासह नागरिकांची धावपळ होते. गेल्या दोन वर्षापूर्वी ऑगस्ट मध्ये आलेल्या महापुराने प्रचंड वित्तहानी होऊन शेतीचेही नुकसान झाले. त्याचे शासकीय सोपस्कार पार पाडत पंचनामे केले गेले परंतु अजून ही त्याची नुकसानभरपाई मिळाली नाही त्यातच दारणा सह इतर छोट्या धरणांतून होत असलेल्या विसर्गामुळे गोदाकाठच्या शेतकऱ्यांची चिंता निर्माण झाली होती.
आ. दिलीप बनकर यांनी जलसंपदाचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांचे समवेत समन्वय साधून धरणांतील होणाऱ्या विसर्गापेक्षा जास्त विसर्ग नांदूर मध्यमेश्वर धरणातून केला गेला.नांदूर मध्यमेश्वर धरणातून १५ सप्टेंबर पर्यंत १५१७८६ क्यूसेक विसर्ग झाला आहे १३ टीएमसी पाणी जायकवाडी कडे रवाना झाले.यामुळे संपुर्ण गोदाकाठ भागात नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या बॅक वॉटरचा प्रभाव जाणवला नाही त्यामुळे थोड्याशा चुकीमुळे निर्माण होणारा महापूर आमदार दिलीप बनकर व जलसंपदाचे अधिकारी यांच्या समन्वयातून टळला गेला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला सर्व धरण भरलेली असताना जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणातून विसर्ग करण्यात आला होता तेव्हा देखील जलसंपदा विभागाच्या योग्य नियोजनामुळे पूरपरिस्थिती टळली होती.
प्रतिक्रिया
जलसंपदाचे अधिकारी यांचे सोबत समन्वय ठेऊन पुरनियंत्रणाचा प्रयत्न केला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पात येणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त विसर्ग वाढवला.प्रसंगी मध्यरात्री धरणाचे गेट उघडण्याच्या सूचना दिल्याने गोदाकाठ भागाला बॅकवॉटर चा फटका बसला नाही – दिलीप बनकर (आ. निफाड विधानसभा)
प्रतिक्रिया
इगतपुरी त्रंबकेश्वर भागातील धरणांत होणाऱ्या पाण्याचा विसर्ग व नांदूर मध्यमेश्वर धरणातील पाणीसाठा यात योग्य समन्वय राखल्याने गोदाकाठ भागात पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. यामुळे आमदार दिलीप बनकर व जलसंपदाचे अधिकारी यांचे कौतुक करावे लागेल – सिद्धार्थ वनारसे ( सदस्य जि.प नाशिक )
प्रतिक्रिया
दारणा व गंगापूर धरणातून पाण्यातून विसर्ग केल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणात पाणी पोहोचण्यास साधारणतः ८ तास लागतात. पाणी पोहोचण्याचे अंदाज करून विसर्ग केला जात असल्याने पाण्याचा फुगवटा यामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती टाळता आली – शरद नागरे ( शाखा अभियंता नांदूरमध्येश्वर धरण)