मा. गांधी यांच्या मते विवेका शिवाय आनंद हे पातक आहे – प्रा.डॉ.रामकृष्ण बदने
मुखेड (गोविंद काळे) : आपण देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. त्या निमित्ताने स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गांधीविचार सप्ताह संपन्न केला जातोय.त्यात महात्मा गांधींनी जी सप्तपातक सांगितली ती अत्यंत महत्त्वाची आहेत. गांधी म्हणाले तत्वाविना राजकारण, नीतीविना व्यापार, मानवतेविना विज्ञान,त्यागाशिवाय उपासना, श्रमा शिवाय संपत्ती, चारित्र्याशिवाय शिक्षण व विवेकाशिवाय आनंद ही सर्व पातक होत. तेंव्हा आपण राजकारणात तत्वाला महत्व दिले पाहिजे,व्यापारा नीतीमत्तेवर आधारित असला पाहिजे, विज्ञानाचा मुख्य उद्देश मानवतेचा विकास असला पाहिजे, उपासनेत त्याग महत्त्वाचा आहे, संपत्ती मिळवावी पण श्रम करून मिळवली पाहिजे,शिक्षणाने चारित्र्याचा विकास व्हावा व विवेकशून्य आनंद असता कामा नये असे असणे म्हणजे ते पातक होय असे प्रतिपादन ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि नांदेड येथील माजी प्राचार्य तथा महाराष्ट्रातील सूप्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांनी कै.सौ.कमलताई जामकर महीला महाविद्यालय परभणी येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा (आय.क्यू.ए.सी.) द्वारे आयोजित गांधी विचार सप्ताहांतर्गत ‘महात्मा गांधींचे सप्तपातक विचार व वर्तमान स्थिती’या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
पुढे बोलताना प्रा.डॉ. रामकृष्ण बदने म्हणाले की आज खऱ्या अर्थाने गांधी विचारांची गरज जगाला जाणवते आहे.केवळ गांधीचे विचार वाचून चालणार नाही तर त्यानुसार वर्तन करणे गरजेचे आहे तरच आपणास स्वातंत्र्याची फळे खऱ्या अर्थाने चाखता येतील व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे फळही प्राप्त होईल.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य,वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता तथा प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत भोसले हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी.च्या समन्वयिका प्रा.डॉ.सौ. ओमप्रभा लोहकरे यांनी करुन कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विस्तृत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपप्राचार्या डॉ. सौ. संगीता अवचार यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. सौ.संगिता लोमटे यांनी करून दिला तर आभार प्रा.सौ. निर्मला जाधव यांनी मानले. कार्यक्रमास झुमच्या माध्यमातून माजी प्राचार्य डॉ.व्यंकट चव्हाण,प्रा. डॉ.उमाकांत पदमवार,प्रा. डॉ.महेश पेंटेवार, डॉ.नरेश परमार, डॉ.अभिजीत सरनाईक व पंजाब, राजस्थान व देभरातून अनेक श्रोते उपस्थित होते.