कष्टातूनच जीवनाचा उत्कर्ष होतो – माजी प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर
महात्मा फुले महाविद्यालयात पदवी वितरण समारंभाचे शानदार आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षणामुळे माणसाला शहाणपण येते. या शहाणपणाला सातत्यपूर्ण कष्टांची जोड दिल्यास माणूस जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतो. माणसाने कष्ट करण्याची प्रवृत्ती जोपासली पाहिजे. कष्टामुळेच माणसाच्या जीवनात उत्कर्ष होतो’, असे प्रतिपादन लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक व संशोधक तथा महात्मा फुले महाविद्यालय, किनगांवचे माजी प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर यांनी केले.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पदवी वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वाडकर बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी भूषविले. तर फुले विचारपीठावर उपप्राचार्य प्रो. डॉ. दुर्गादास चौधरी, संयोजक तथा परीक्षा विभाग प्रमुख प्रो.डॉ. अभिजीत मोरे, महाविद्यालय विकास समितीचे सद्स्य डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ. नागराज मुळे, डॉ. बी. के. मोरे , प्रो. डॉ. अनिल मुंढे व संयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, यशवंत अध्यापक महाविद्यालयाचे प्रा. परमेश्वर वाकडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वाडकर म्हणाले की, सध्याच्या काळात शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्याचे साधन राहिले नसून, आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक झाले आहे. शिक्षणातून आधुनिकतेची कास धरली पाहिजे. नवी जीवन मूल्ये अंगिकारली पाहिजे. शिक्षणातून मिळालेल्या शहाणपणाचा सामाजिक जीवनात आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी उपयोग केला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पदवी धारण केल्यानंतर स्वतःला पूर्णपणे बदलून घेतले पाहिजे. पदवीधारक झालेल्यांना कामाची लाज वाटली तर मिळालेल्या पदव्या कुचकामी ठरतात. शिक्षणाने माणसाच्या अंगी नम्रता आली पाहिजे, सहनशीलता आली पाहिजे. पदवी मिळाली की नोकरी लगेच मिळत नसते. त्यासाठी ध्येय निश्चित करुन ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. जागतिकीकरणाच्या काळात नवनिर्मिती करणारे आणि ज्यांना चांगले बोलता येते असे लोकच यशस्वी होऊ शकतात. म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य विकसित केले पाहिजे. पालकांनीही आपल्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर न लादता त्यांना अभ्यासाचे, निवडीचे स्वातंत्र्य दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचे हस्ते विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक क्रीडा तथा परीक्षा विभाग प्रमुख डॉ. अभिजीत मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. यावेळी कोरोनाचे नियम पाळून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व पदवी प्राप्त विद्यार्थी व पालक उपस्थित होते.