अगोदरच संकटात आलेल्या शेतकऱ्यांना सरकारने काळी दिवाळी साजरी करण्यास भाग पाडू नये– नागनाथ बोडके
उदगीर (एल.पी.उगीले) : निसर्गाने कधी अतिवृष्टी, कधी महापूर तर कधी पावसाने दिलेली ताडन अशा अस्मानी संकटात होरपळून गेलेल्या शेतकऱ्यांना विशेषत: सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठ्याप्रमाणात झटका बसला आहे. सोयाबीन पिकाच्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. अक्षरश: शेतकऱ्यांचे स्वप्न मातीत मिसळले गेले, यादरम्यान शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी. अशा पद्धतीची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली होती. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आग्रही केली होती. त्यानंतर विरोधी पक्षाच्या दबावाखाली महागडी सरकारने नाईलाज म्हणून हेक्टरी दहा हजार रुपये मदत जाहीर केली. काहीतरी आपल्या पदरात मिळेल म्हणून शेतकरी थोडा सुखावला होता. शेतकऱ्याला दिलासा वाटला होता, कारण पेरणीच्या दरम्यान शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती. नियमाप्रमाणे विमाहप्ता ही भरला होता. मात्र विम्याचे काय झाले? या संदर्भात सरकारमधील जबाबदार व्यक्ती वा मंत्री कोणीही बोलायला तयार नाहीत. अशी घणाघाती टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके यांनी केली आहे.
शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने भरडून निघाला आहे. शेतकऱ्यांनी आता दिवाळी साजरी कशी करावी? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे. मराठवाड्यात विशेषत: उदगीर, जळकोट या भागात कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात आहे. गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला भाव आला म्हणून या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन चा पिक पेरा मोठ्या प्रमाणात केला. मात्र दुर्दैवाने सुरुवातीला पावसाने ताडण दिली आणि त्यानंतर इतकी अतिवृष्टी झाली की पीक हातचे वाहून गेले, काही शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा खरवडून गेल्या. त्यांच्या नुकसानीच्या बाबतीत तर बोलणेच नको! हे नुकसान बाजूला ठेवून शेतकरी किमान दिवाळी साजरी करण्यासाठी तरी शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी का होत नाही मदत मिळेल, अशी आशा ठेवून बसले आहेत. मात्र जाहीर केलेली ही मदत कधी मिळणार? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर पडला आहे. महाआघाडी सरकारने विमा कंपन्यांना त्वरित आदेश देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास सुरुवात केली तर दिवाळी गोड होईल, आणि किमान हेक्टरी 10 हजार देऊ केलेली मदत शेतकऱ्यांना कर्ज नाही तर कर्जाचे व्याज तरी फेडायला हातभार लावेल.
तसेच शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून संकटग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी. महागाईचे संकट दूर करायचे असेल तर पेट्रोल व डिझेल जिएसटी कराच्या आधिपत्याखाली आणले पाहिजे, त्यासोबतच शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केले पाहिजे. हे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा दिवाळीच्या आनंद उत्सवावर विरजण पडल्याशिवाय राहणार नाही.
शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करायला शासनाला भाग पाडू, राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण ताकदीनिशी शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अशीही ग्वाही याप्रसंगी नागनाथ बोडके यांनी दिली आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा वाली बनुन राष्ट्रीय समाज पक्ष काम करतो आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर येऊ, असा इशाराही नागनाथ बोडके यांनी दिला आहे. शासनाने नैतिक जबाबदारी सांभाळून दिवाळी सणाच्या अगोदर शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे मिळतील असे नियोजन करावे. अशी ही आग्रही मागणी नागनाथ बोडके यांनी केली आहे.